अतिक्रमणच्या कर्मचाऱ्याने भाजीविक्रेत्याच्या डोक्यात मारला स्पीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:10 AM2021-05-12T04:10:52+5:302021-05-12T04:10:52+5:30
हडपसर : महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भाजीविक्रेत्या महिलेच्या डोक्यात स्पीकर मारल्याने गंभीर दुखापत झाली. तिला अस्वस्थ ...
हडपसर : महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भाजीविक्रेत्या महिलेच्या डोक्यात स्पीकर मारल्याने गंभीर दुखापत झाली. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिने हडपसर पोलीस स्टेशन गाठले. हा प्रकार मंगळवार, दि. ११ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडला.
रक्मिणी संतोष धोत्रे (वय २७, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. हडपसर-गाडीतळ ते मंत्री मार्केट दरम्यान भाजीविक्रेते दररोज सकाळी ८ ते १० दरम्यान असतात. आज सकाळी ९ च्या सुमारास अतिक्रमण विभागाची गाडी आली. त्यामुळे धोत्रे यांनी माल गोळा करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी तिच्या हातातील माल हिसकावला. मात्र, त्याला तिने विरोध करताच अतिक्रमणच्या कर्मचाऱ्यांनी स्पीकर तिच्या डोक्यात घातला. तो उजव्या डोळ्याच्या वर लागल्याने रक्त वाहू लागले. तिने हातातील माल सोडून मार लागलेल्या ठिकाणी हाताने दाबून धरत पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तिला तिच्या मैत्रिणीसोबत ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.
कोट
हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू म्हणाले की, अनधिकृत भाजीविक्रेत्यांवर कारवाई सुरू होती. त्या वेळी त्या महिलेने विरोध करत कर्मचाऱ्यांबरोबर झटापट केली. त्या महिलेने ओढाताण केली. त्यामध्ये ती पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. अनधिकृत भाजीविक्रेते अर्ध्या रस्ता अडवून ठेवतात, त्यामुळे अपघातसदृशस्थिती निर्माण होते, त्यामुळे कारवाई केली जाते, असे त्यांनी सांगितले.