जिवंतपणी आख्यायिका बनलेल्या दिलीपकुमार युगाचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:19+5:302021-07-08T04:09:19+5:30
संहितेतील गद्य संवाद सूक्ष्म अशा संगीतमय पद्धतीने सादर करणाऱ्या या असामान्य बुद्धिमान अभिनेत्याने आजवर अनेक व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर अजरामर ...
संहितेतील गद्य संवाद सूक्ष्म अशा संगीतमय पद्धतीने सादर करणाऱ्या या असामान्य बुद्धिमान अभिनेत्याने आजवर अनेक व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर अजरामर केल्या आहेत. १९३१ साली भारतीय चित्रपट बोलू लागले आणि त्यानंतर अवघ्या १४ वर्षांनी १९४४ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. चित्रपटातील अभिनय वास्तववादी व नैसर्गिक व्हावा यासाठी आपल्या हृदयातच एक प्रयोगशाळा तयार केली आणि तो निरंतर प्रयोग करीत राहिला. या प्रयोगातून त्याने अनेक व्यक्तिरेखा रुपेरी पड्यावर उभ्या केल्या. संयत भावनिक दृष्ये त्याची खासियत होती. मृत्यू दृष्यांत तो लोकांची हृदये हेलावून टाकत असे. ‘ट्रॅजेडी किंग’ हे बिरूद त्याच्याशी जोडलं गेलं. प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारा जागतिक दर्जाचा तो अभिनेता होता. असेही म्हटले तरी वावगे ठरणार नाही की दिलीपकुमार ‘देवदास’च्या व्यक्तिरेखेसाठीच जन्माला आला. ‘गंगा जमुना’मध्ये थरकाप उडविणाऱ्यां गंगाची व्यक्तिरेखा साकार करून त्यांनी आपल्या अभिनयाची कक्षा किती विस्तीर्ण केली हे दाखवून दिलं. आजवर अनेक पोषाखी चित्रपट अपयशी ठरलेत, परंतु ‘मुघले आझम’ने न भूतो न भविष्यती यश संपादन केले. प्रिन्स सलीमच्या व्यक्तिरेखेद्वारा मानवी विलक्षण प्रेमभावना प्रकट करून दिलीपकुमार याने असामान्य यश प्राप्त केले. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत अवघ्या छप्पन्न चित्रपटांमधून त्याने अभिनयाचे अनेक मानदंड प्रस्थापित केले आणि जगभरातील लाखो, करोडो प्रेक्षकांच्या हृदयात कधीही न पुसले जाणारे असे अविस्मरणीय क्षण दिलेत. जिवंतपणी आख्यायिका बनलेल्या दिलीपकुमारचे खऱ्या अर्थाने एक आज संपुष्टात आलंय....या खऱ्या लिजेंड्री व्यक्तिमत्त्वाला माझी श्रद्धांजली!
कृपाशंकर शर्मा, चित्रपट अभ्यासक