Pune: प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: April 3, 2024 02:58 PM2024-04-03T14:58:47+5:302024-04-03T15:00:54+5:30
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला....
पुणे : प्रेम प्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. तरुणीला लग्न करण्यासाठी त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
उत्कर्षा संतोष लोंढे (२०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. उत्कर्षाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदित्य चंद्रकांत ढावरे (२५, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उत्कर्षाचे वडील संतोष लोंढे (४५) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्षाचे आरोपी आदित्य याच्याशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आदित्यच्या कुटुंबीयांना प्रेम प्रकरणाची माहिती होती. उत्कर्षा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करु, असे तिने त्याला सांगितले होते. आदित्यने तिला नोकरी मिळाल्यानंतर लग्न करु, असे सांगितले होते.
आदित्यचा आईचा मृत्यू झाला. तेव्हा वर्षभरात लग्न न केल्यास पुढील तीन वर्ष लग्न करता येणार नाही, असे आदित्यने तिला सांगितले. त्याने लग्नासाठी तगादा लावला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न करु, असे तिने त्याला सांगितले. मात्र, आदित्यच्या त्रासामुळे उत्कर्षाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विद्या सावंत करत आहेत.