कामावरून काढून टाकल्याने नदीत उडी मारून संपवलं जीवन; खासगी कंपनीतील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 13:31 IST2024-07-22T13:31:16+5:302024-07-22T13:31:41+5:30
तरुणाने चिठ्ठीत कंपनी व्यवस्थापकाच्या त्रासाने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले

कामावरून काढून टाकल्याने नदीत उडी मारून संपवलं जीवन; खासगी कंपनीतील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा
पुणे : कामावरून काढून टाकल्याने तरुणाने बोपाेडीतील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून खासगी कंपनीतील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल प्रमोद साळवी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. साळवी याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून खासगी कंपनीचे व्यवस्थापक झिशान हैदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशालची बहीण प्रीती अमित कांबळे (४२, रा. साम्राज्य सोसायटी, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रीती यांचा भाऊ विशाल येरवड्यातील काॅमर झोन आयटी पार्कमधील एका खासगी कंपनीत कामाला होता. कंपनीतील व्यवस्थापक झिशान हैदर याने विशालला कंपनीतील कामगारांसमोर अपमानित केले. कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. विशालला कामावरून कमी करण्यात आल्याने विशाल नैराश्यात होता. २१ जून रोजी त्याने बोपोडीतील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विशालने सोशल मीडियावर चिठ्ठी आणि झिशान हैदरचा फोटो टाकला होता. कामावरून काढून टाकणे, तसेच कंपनी व्यवस्थापकाच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आले होते, असे विशालची बहीण प्रीती यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक चोरमले करत आहेत.