रश्मीकांत तोरणे अपहरण प्रकरणाचा दु:खद शेवट
By Admin | Published: July 14, 2016 12:45 AM2016-07-14T00:45:14+5:302016-07-14T00:45:14+5:30
सोळा महिन्यांपूर्वी घडलेल्या बावडा येथील अपहरण करण्यात आलेल्या रश्मीकांत तोरणे याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
इंदापूर : सोळा महिन्यांपूर्वी घडलेल्या बावडा येथील अपहरण करण्यात आलेल्या रश्मीकांत तोरणे याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर, त्याने रश्मीकांतचे अपहरण करून त्याचा खून करून मृतदेह जमिनीत गाडून टाकल्याची कबुली दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी भारत ऊर्फ पिंटू तुकाराम सोनवणे (वय २२, रा. इंदिरानगर, बावडा) आहे. अक्षय ऊर्फ सोनू गौतम जगधने (वय २१, रा. बावडा, मूळ रा. घेरडी वाकी, ता. सांगोला), हर्षल ऊर्फ अनिकेत राजेंद्र बोरे (वय २०, रा. बावडा) अशी आज अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर संतोष ऊर्फ काळुराम राजेंद्र घोडके (वय २०), प्रवीण ऊर्फ पवन दुर्योधन जाधव (वय २१ वर्षे), विनोद अरुण झेंडे (वय २५, सर्व रा. बावडा), अक्षय ऊर्फ किशोर अर्जुन बागल (वय २१, रा. वडापुरी, ता. इंदापूर) अशी या प्रकरणात या पूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ज्येष्ठ पत्रकार व बावडा गावचे रहिवासी रमाकांत हरी तोरणे यांचा रश्मीकांत रजनीकांत तोरणे (वय १९, रा. बावडा) हा नातू आहे. तो बारावीमध्ये शिक्षण घेत होता. १५ मार्च पासून तो बेपत्ता होता. दि.२१ मार्च २०१५ रोजी तो बेपत्ता झाल्याची खबर रमाकांत तोरणे यांनी बावडा औट पोस्टला नोंदवली. त्यांनी काही आरोपींची नावेही पोलिसांना दिली होती. तपास काही लागत नव्हता. आरोपी सापडत नव्हते. त्यामुळे चार महिने वाट पाहिल्यानंतर चार महिन्यांनी तोरणे कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. २ जुलै २०१५ रोजी सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी संतोष ऊर्फ काळुराम घोडके, प्रवीण ऊर्फ पवन जाधव, अक्षय ऊर्फ किशोर जाधव, विनोद झेंडे या चौघा आरोपींविरुद्ध संगनमत करून जिवे मारण्याच्या उद्देशाने रश्मीकांतला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. दि. २७ जुलै २०१५ रोजी भारत सोनवणे वगळता इतरांना पकडण्यात पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांना यश मिळाले. सोनवणे हा फरारी झाला. तो सापडत नव्हता.
गुन्हा घडून एक वर्ष झाल्यानंतर तोरणे कुटुंबीयांनी पुण्यात जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. त्या वेळी इंदापूर पोलिसांकडून तपास काढून घेण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिले. अपहरण प्रकरण होऊन १६ महिने उलटून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर तोरणे कुटुंबीयांनी पुन्हा दि. २८ जून २०१६ रोजी कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरूकेले. यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे विभागाकडे दिला.
या प्रकरणाचा तपास केवळ बारा दिवसांपूर्वी हातात घेतल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, राजेश रामाघरे, हवालदार बाळासाहेब सकाटे, दयानंद लिमण, दत्तात्रय जगताप, अनिल वाघमारे, मुन्ना मुत्तनवार, पोलीस नाईक नीलेश कदम, प्रवीण मोरे, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, विघ्नहर गाडे, चंद्रकांत वाघ यांच्या पथकाने संपूर्ण प्रकरण व घटनांच्या तपासाची माहिती घेतली. फरारी आरोपीचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित केले.
आज सकाळी सहा वाजता इंदापूरमध्ये मुख्य आरोपी सोनवणे हा पथकाच्या जाळ्यात सापडला. एक तास कसून चौकशी केल्यानंतर त्याने याप्रकरणी कबुली दिली. बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार वर्षा लांडगे, उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, मंडलाधिकारी संतोष अनगरे यांच्यासह सर्व फौजफाटा सकाळी सव्वादहा वाजता बावड्याकडे रवाना झाला.