शत्रूला धास्ती ‘प्रचंड’ची, पुण्यातील एआरडीईतर्फे निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 05:39 AM2017-11-25T05:39:46+5:302017-11-25T05:40:20+5:30
पुणे : युद्धात शत्रूचा वेग कमी करण्यात भूसुरुंग महत्त्वाची भूमिका बजावतात.
निनाद देशमुख
पुणे : युद्धात शत्रूचा वेग कमी करण्यात भूसुरुंग महत्त्वाची भूमिका बजावतात. पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅल्बिशमेंटतर्फे ‘प्रचंड’ नामक स्मार्ट भूसुरुंग विकसित करण्यात आले असून, त्यामुळे शत्रूच्या रणगाड्यांचा अचूक वेध घेणे शक्य होणार आहे. सध्या या भूसुरुंगाच्या चाचण्या सुरू असून, लवकरच ते लष्कराला सुपुर्र्द करण्यात येणार आहेत.
शत्रूच्या सीमेमध्ये वेगाने शिरण्यासाठी रणगाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. या रणगाड्यांना वेळीच रोखणे महत्त्वाचे असते. यासाठी रणगाडाविरोधी भूसुरुंग महत्त्वाचे असतात. रणगाडा या भूसुरुंगावरून गेल्यावर त्याच्या वजनाने स्फोट व्हायचा. यात प्रत्येक वेळेला स्फोट होईलच, याची श्वाश्वती नसल्याने लष्करातर्फे स्मार्ट भूसुरुंगाच्या निर्मितीची मागणी झाली होती. त्यानुसार, पुण्यातील एआरडीईने अदृश्य मार्क २ हे भूसुरुंग बनविले होते. मात्र, आधुनिक भूसुरुंगाची मागणी करण्यात आली. त्यानुसार, ‘प्रचंड’ या भूसुरुंगाचा निर्मिती करण्यात येत आहे.
‘प्रचंड’मध्ये मॅग्नेटिक आणि सीएटींक सेन्सर बसविण्यात आले आहे. यामुळे या भूसुरुंगावरून गेलेल्या वाहनांचे वर्गीकरण या भूसुरुंगाला करता येणार आहे. रणगाडा असल्यास सेंकदाच्या आत त्यांचा स्फोट होऊन शत्रूचा रणगाडा पूर्णपणे निकामी करता येणार आहे. अभेद्य रणगाड्याला भेदण्याची क्षमता या भूसुरुंगातील स्फोटकांमध्ये आहे. रिमोटद्वारेसुद्धा याचे नियंत्रण करता येते.
जमिनीखाली १५ सेंटिमीटर हे सुरुंग पेरण्यात येतात. शत्रूने जमीन नांगरून तसेच अवजड भूसुरुंगविरोधी वाहनांद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला, तरी हे भूसुरुंग शोधता येत नाहीत. यातील अति उच्च दर्जाच्या सेन्सरमुळे हे शक्य झाले आहे. यातील सर्व यंत्रणा भारतीय बनावटीची आहे.
प्रंचडमध्ये बसविण्यात आलेल्या सेन्सरमुळे जीपीएस प्रणालीद्वारे ते पेरल्यानंतर त्याचा शोध घेता येणे शक्य आहे़ हे स्फोटक ९० दिवस जमिनीखाली राहू शकते़
>पुनर्वापर शक्य
प्रचंडमध्ये बसविण्यात आलेल्या सेन्सरमुळे जीपीएस प्रणालीद्वारे ते पेरल्यानंतर त्याचा शोध घेता येणे शक्य आहे. याचबरोबर ट्रान्समीटरद्वारे ते निकामी करून पुन्हा त्यांचा वापर करता येणे शक्य आहे. हे स्फोटक ९० दिवस जमिनीखाली राहू शकते.
फ्रान्समध्ये एचपीपीएफ २ हे आधुनिक भूसुरुंग विकसित करण्यात आले आहे. प्रचंड त्याहीपेक्षा अधिक सक्षम आहे. दोन्ही भूसुरुंगांच्या चाचण्या एआरडीईतर्फे करण्यात आल्या असून, त्यात प्रचंड भूसुरुंग अधिक शक्तिशाली असल्याचे सिद्ध झाले आहे. आणखी काही चाचण्या पूर्ण झाल्यावर ते लष्करला देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.