कोंदणाशिवाय तरुणाईची ऊर्जा असहिष्णू

By admin | Published: December 25, 2015 01:57 AM2015-12-25T01:57:23+5:302015-12-25T01:57:23+5:30

सांस्कृतिक शहरातील महोत्सवांतून तरुणांच्या ऊर्जेला वाट मिळत आहे. या ऊर्जेला कोंदण न मिळाल्यास, ती असहिष्णू होईल.

Energy intolerant without youthfulness | कोंदणाशिवाय तरुणाईची ऊर्जा असहिष्णू

कोंदणाशिवाय तरुणाईची ऊर्जा असहिष्णू

Next

पुणे : सांस्कृतिक शहरातील महोत्सवांतून तरुणांच्या ऊर्जेला वाट मिळत आहे. या ऊर्जेला कोंदण न मिळाल्यास, ती असहिष्णू होईल. त्यामुळे कलेचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना शासनातर्फे अनुदान मिळायला हवे. पायाभूत सुविधांसाठीही शासनाने पुढाकार घ्यायला हवा, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्तकेले.
कला, गायन, वादन, संगीत नाट्य यांचा मनोहारी मिलाप असणाऱ्या शनिवारवाडा कलामहोत्सवास दिमाखात प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्घाटन सतीश आळेकर व ज्येष्ठ व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी आळेकर बोलत होते. याप्रसंगी आमदार विजय काळे उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘१९६१ मध्ये झालेल्या पडझडीतून पुण्याला पुनरुज्जीवित करण्याची संधी राजकीय पक्षांना मिळाली होती; मात्र त्यांनी ती दवडली. पूर्वी पुणे हे पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जायचे. आता ते शैक्षणिक संस्थांचे, तरुणांचे शहर बनले आहे. तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ललित कला केंद्रासारख्या संस्था कार्यरत आहेत; मात्र ही प्रशिक्षण केंद्रे विनाअनुदानित तत्त्वावर चालवली जातात. त्यांना सरकारचे कोणतेही पाठबळ मिळत नाही. त्यासाठी शासनाने धोरण आखून, अनुदान आणि पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करायला हवेत.
आळेकर म्हणाले, ‘शहरामध्ये अनेक सभागृहे, प्रेक्षागृहे उभी राहत आहेत. चित्रपट, लघुपट, नृत्य, संगीत महोत्सव दिमाखदारपणे साजरे होत आहेत. प्रेक्षागृहांची देखभालही व्यवस्थित झाली पाहिजे. प्रत्येक तिकिटातला एक रुपया खर्च केला, तरी निधी जमा होऊ शकेल. विंगेतील व्यवस्था चोख असेल, तर नाटक रंगते. त्याचप्रमाणे सर्व सोयीसुविधा पुरवल्या, तर महोत्सव आणि प्रयोग अधिक रंगतील. प्रत्येक प्रयोग अथवा कार्यक्रम झाला की, स्वच्छता व्हायला हवी. कला ६० टक्के लोकाश्रयावर, तर ४० टक्के शासनाच्या पाठिंब्यावर टिकते. त्यामुळे कला उजळण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.’ प्रभाकर जोग यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.
या सोहळ्यात गायिका अनुराधा मराठे, तबलावादक राजू जावळकर; तसेच संगीतक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्रीसंत दर्शन मंडळ संस्थेच्या श्रीराम राठे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी अनुराधा मराठे म्हणाल्या, ‘केवळ गुरूंमुळे संगीताची अनेक वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली आहे. कठोर परिश्रमाशिवाय कला साध्य होत नाही.’ (प्रतिनिधी)

Web Title: Energy intolerant without youthfulness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.