उसाच्या रसातून स्पर्धा परीक्षा देण्याची ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 05:23 AM2018-04-23T05:23:44+5:302018-04-23T05:23:44+5:30
अधिकारी होण्याचे स्वप्न : एमए, बीएड असूनही मिळेना नोकरी
पुणे : ‘‘गावी काही राहिलं नाही त्यामुळे पुण्यात नोकरीसाठी आलोय. स्पर्धा परीक्षा देऊन मला अधिकारी व्हायचंय. मागच्या वेळी १० मार्काने पास व्हायचे हुकले; पण आता पुन्हा अभ्यास सुरू केलाय. आता पैसे नसल्याने चरख्यावर १२-१२ तास काम करावं लागतंय. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय. अधिकारी व्हायचं स्वप्न मात्र अजूनही मनात तसंच हाय. ते पूर्ण करणारच हाय,’’ हे बोल आहेत एमए, बी.एड. झालेल्या सुवर्णा भोसले यांचे. उसाच्या गाड्यावर त्या काम करत असून, संकटांना गाड्याच्या चाकात घालून भविष्यासाठी ‘गोडवा’ निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून भोसले दाम्पत्य पुण्यात आले. बार्शीजवळील वैराग गावातील हे दाम्पत्य काही काम करून जीवन जगत आहे. काही दिवसांपूर्वी सुवर्णा यांचे पती संतोष भोसले बांधकामावर कामाला जायचे. तेव्हा सुवर्णा घरी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असत. सध्या कुठे काम नसल्यामुळे त्यांनी उसाचा गाडा सुरू केला आहे. त्यातून त्यांना दिवसाला कधी दोनशे तर कधी हजार रुपये मिळतात. सकाळी ९ पासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ते उसाचा गाडा चालवतात. सुवर्णा यांना शिकण्याची जिद्द असून, त्यांना त्यांचे पती संतोष पाठिंबा देत आहेत. ‘तु शिक, मी आहे तुझ्या पाठीशी’ अशी थाप त्यांनी तिच्या जिद्दीला दिली आहे. ते स्वत: बारावी पास असले, तरी त्यांनी पत्नीला अधिकारी होण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे.
एकीकडे लाख-लाख पगार असणारे आयटी अभियंते किंवा चांगले पगारदार तरुण थोडेसे संकट आले की घाबरून जातात आणि मग डिप्रेशनमध्ये जाऊन स्वत:ला संपवून टाकतात. पण, या गावाकडच्या सावित्रीच्या लेकीमध्ये शिकून अधिकारी होण्याची आस दिवसेंदिवस मनात धुमसत आहे. उसाच्या रसातून तिला संकटांना लढण्याची जणूकाही ऊर्जाच मिळत आहे. ती हरलेली नाही. ती जिंकण्यासाठी भर उन्हामध्ये काम करून स्पर्धा परीक्षा देण्याची जिद्द मनी बाळगून आहे.
मी आतापर्यंत दोनदा एमपीएससीची परीक्षा दिली आहे. त्यात पहिल्या प्रयत्नात केवळ १० मार्काने माझे पासिंग हुकले. परंतु, मी खचले नाही. मी पुण्यात स्पर्धा परीक्षेचा क्लास लावला होता. आता पुन्हा हे उसाचे काम संपल्यानंतर क्लास लावणार आहे. या गाड्यातून पैसे जमा करून मला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे आहे. घरात काहीच नाही, त्यामुळे मला स्पर्धा परीक्षा द्यायचीच आहे.
- सुवर्णा संतोष भोसले