मंगलमूर्ती मोरया! लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गुंतले हात; पुण्यात मंडळांकडून तयारी सुरू, देखावे, मंडप टाकण्यात कार्यकर्ते मग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 04:12 PM2024-08-20T16:12:28+5:302024-08-20T16:13:30+5:30
वाहतुकीचे योग्य नियोजन, महिलांसाठी स्वच्छतागृह, पोलीस बंदोबस्त करताना कार्यकर्त्यांचा समावेश अशा अपेक्षा मंडळांनी व्यक्त केल्या आहेत
पुणे: लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले असून, ठिकठिकाणी मंडप उभारण्यात येत आहेत. याचबरोबर सामाजिक संदेश देण्यासाठी देखाव्यांची तयारी केली जात आहे. अनेक मंडळांचे देखावे सज्ज होत असून, यावर्षी वेगळा गणेशोत्सव साजरा करू, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. पावसाने कृपा केल्याने धरणंही भरली असून, बाजारपेठेमध्येही गजबज पाहायला मिळत आहे.
गणरायाच्या भेटीसाठी पुणेकर आतुर झाले आहेत. त्यामुळेच शहरामध्ये गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. बाजारपेठेतही ग्राहकांची गर्दी होत असून, दुकाने गजबजून गेली आहेत. पेठांमधील गणेश मंडळांनी आपल्या मंडपाची तयारी सुरू केली आहे.
आमच्या मंडळाची तयारी दहीहंडीनंतर सुरू होते. परवा आम्ही पूजा करणार असून, त्यानंतर सर्व तयारीला लागणार आहोत. - प्रवीण परदेशी, गुरुजी तालीम मंडळ
मांडव टाकून झाला आहेे. सजावटीची तयारी सुरू आहे. यंदा जगन्नाथपुरीचा देखावा करणार आहोत. गाभाऱ्यात जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा यांच्या प्रतिमा असणार आहेत. देखाव्याचे कामही पूर्ण होत आहे. - नितीन पंडित, तुळशीबाग गणेश मंडळ
शनिमारुती बालगणेश मंडळ साकारणार दूध भेसळीवर देखावा
दूध भेसळीवर देखावा केला असून, बनावट पनीर मोठ्या प्रमाणावर येत आहे. खरंतर दूध व्यवसाय हा हजारो वर्षांपासूनचा आहे; पण आता मागणी वाढल्याने त्यात बनावटगिरी आली. प्रोटिनसाठी दूध आवश्यक असते. म्हणून लोकं पनीर खातात; पण ते देखील बनावट येऊ लागलेय. आपण पनीर खातोय की, विष?. यावरण गवळण असून, ते वासुदेव सांगतोय. तो आरोग्याचे दान मागतोय. ग्राहकांनी जागे व्हायला हवे, असा देखावा साकारला जाणार आहे.
गडकिल्ला संवर्धनविषयक देखावा
सिंहगडावर तरुणाई गर्दी करताना दिसते; पण तिथला इतिहास जाणून घेत नाही. केवळ भजी, पिठलं भाकरी खायला जाते. तसे न होता तेथील इतिहास जाणून घेतला पाहिजे. म्हणून यावर देखावा केला जाणार आहे. अनेक कार्यकर्ते गडकिल्ल्यांवर स्वच्छता करतात. लोकं तिथे जाऊन घाण करतात. ते करू नये म्हणून आम्ही संदेश देणार आहोत. - पियुष शहा, साईनाथ मंडळ, बुधवार पेठ
सुभाषचंद्र बोस यांच्यावर देखावा
यंदा मंडळाने ‘बोस-द रियल हिरो’ या विषयावर देखावा केला आहे. त्याची तयारी सुरू असून, आपल्या स्वातंत्र्यलढ्यात सुभाषचंद्र बोस यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्याविषयीचे सर्व काही जिवंत देखाव्यातून दाखविण्यात येणार आहे. - प्रल्हाद थोरात, अध्यक्ष, शिवाजी मित्रमंडळ, भवानी पेठ
मंडळांकडून अपेक्षा
१) तात्पुरती वीजजोडणी घेताना आम्ही डिपॉझिट भरतो; पण उत्सव झाल्यावर हे डिपॉझिट लवकर परत मिळत नाही. ते त्वरित मिळावे. कारण ऑनलाइन अर्ज करताना बँकेची माहिती दिलेली असते. जेवढे बिल झाले, ते कट करून शिल्लक आम्हाला त्वरित मिळावे.
२) गणेशोत्सवात पोलिसांचा बंदोबस्त ठेवताना अनेक कर्मचारी बाहेरून मागवतात. तसे न करता इथे जे आहेत, कार्यकर्त्यांच्या, मंडळाच्या ओळखीचे त्यांनाच बंदोबस्त द्यावा. जेणेकरून ते एकमेकांना ओळखतात आणि कोणतीही समस्या निर्माण होत नाही. पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत.
३) गणेशोत्सव काळात वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केले तर वाहतूक सुरळीत होऊ शकते. त्यांना आमच्या मंडळाचे कार्यकर्तेही सहकार्य करतील.
४) महिलांसाठी स्वच्छतागृहाची तयारी करावी. कारण त्यांचे खूप हाल होतात. त्यांच्यासाठी पिंक बसची सोय व्हावी.
५) मध्यवर्ती भागातील स्वच्छतागृहे सतत स्वच्छ करणे गरजेचे आहे. अन्यथा प्रचंड दुर्गंधी सुटते.
ढोलवादनाचा सराव जोरात
गणरायाच्या सेवेसाठी ढोल पथकांचा सराव जोरात सुरू आहे. अनेक मंडळांनी ढोल पथकांकडे नोंदणी केली आहे. त्यामुळे महिनाभरापासूनच ढोलवादनाची तयारी सुरू आहे. सायंकाळ झाली की, ढोलवादनाचा सराव सुरू असतो.
जाहिरातींच्या कमानी उभ्या
शहरात अनेक मंडळे वर्गणी घेत नाहीत. ते मग जाहिराती घेऊन त्यातून खर्च भागवतात. त्यासाठी मंडळासमोर रस्त्यालगत मंडप उभारून त्यावर जाहिराती लावतात. त्यातून मंडळाला पैसे मिळतात. वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशाप्रकारे ही कामे सुरू आहेत.
दहीहंडीनंतर अनेकांची तयारी
अनेक गणेश मंडळांची तयारी ही दहीहंडी उत्सव झाल्यानंतर सुरू होते; परंतु काही मंडळे आतापासूनच मंडप उभारणी करत असून, देखावे सज्ज करत आहेत.