मालकाला बोलण्यात गुंतवले; दिवसा - ढवळ्या हातसफाई करून दागिने पळवले, येरवड्यातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Published: May 9, 2024 08:34 PM2024-05-09T20:34:55+5:302024-05-09T20:35:36+5:30
सराफी पेढीतील कप्यात ठेवलेले मंगळसूत्र, मणी, सोन्याच्या नऊ अंगठ्या असा एकूण १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला
पुणे : सराफ व्यावसायिकाच्या दुकानातून चांदीची मूर्ती घेण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून तब्बल १९ लाख १८ हजारांचे दागिनेचोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी दुकानातील ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरल्याची तक्रार दुकानदाराने केली आहे. याप्रकरणी सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (दि. ९) येरवडा बाजार येथील महावीर ज्वेलर्स येथे घडली आहे. याबाबत सराफ व्यावसायिक राकेश गोपीलाल जैन (वय- ४४) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राकेश जैन यांची येरवड्यातील बाजारपेठेत महावीर ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अनोळखी सहा व्यक्तींनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. सराफी पेढीत चांदीची मूती खरेदी करायची आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सराफाला बोलण्यात गुंतवून एका चोरट्याने मुलीसाठी सोन्याची अंगठी दाखवा, असे सांगितले. जैन यांचे लक्ष नसल्याची संधी साधून त्यातील दोघा चोरट्यांनी सराफी पेढीतील कप्यात ठेवलेले मंगळसूत्र, मणी, सोन्याच्या नऊ अंगठ्या असा एकूण १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास जैन यांनी सराफी पेढीतील दागिन्यांची तपासणी केली. तेव्हा कप्यात ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. जैन यांनी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता कप्यात ठेवलेल्या पिशवीतील दागिने चोरून चोरटे पसार झाल्याचे लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करत आहेत.