अभियंता तरुणी खूनप्रकरणी आरोपीस अटक
By admin | Published: December 30, 2016 05:05 AM2016-12-30T05:05:55+5:302016-12-30T05:05:55+5:30
एकतर्फी प्रेमप्रकरणातून सॉफ्टवेअर अभियंता अंतरा दास हिच्या खुनातील संशयित तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक करून वडगाव (मावळ) न्यायालयात गुरुवारी हजर केले.
पिंपरी : एकतर्फी प्रेमप्रकरणातून सॉफ्टवेअर अभियंता अंतरा दास हिच्या खुनातील संशयित तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक करून वडगाव (मावळ) न्यायालयात गुरुवारी हजर केले. या वेळी न्यायालयाने आरोपीला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अन्य तीन आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथक बंगळुरूला पाठविण्यात आले आहे.
देहूरोड पोलिसांनी संतोष कुमार (वय २४, रा. बिहार) या तरुणाला अंतराच्या खूनप्रकरणात संशयित आरोपी म्हणून बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला दुपारी वडगाव न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपी हा मूळचा बिहारचा असून, तो बंगळुरूमध्ये आयटी कंपनीत नोकरी करतो. बंगळुरू येथे अंतरा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये संगणकाचे शिक्षण घेत होती त्याच इन्स्टिट्यूटमध्ये आरोपी संतोषसुद्धा शिक्षण घेत होता. त्या वेळी त्यांची ओळख झाली होती. अंतराने नोकरीसाठी पुण्यातील कंपनीत प्रयत्न सुरू केले. तिला तळवडेतील कॅपजेमिनी कंपनीत नोकरीसुद्धा मिळाली. ज्या वेळी ती पुण्यातील कंपनीत मुलाखतीसाठी आली होती, त्या वेळी आरोपी संतोषसुद्धा पुण्यात येऊन गेला होता.
एक वर्षापासून आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिच्याकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. अंतरा त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हती. संतोष मात्र तिला वारंवार मोबाईलवर संदेश पाठवून आपल्या भावना व्यक्त करत होता. अंतराने मात्र याबाबत त्याला प्रतिसाद दिला नव्हता. पुण्यात अंतरा कोणाच्या संपर्कात आहे, तिचा दैनंदिन नित्यक्रम कसा आहे, ती कोणाला भेटते, कोणाबरोबर फिरते, या तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास त्याने पुण्यातील मित्रांना सांगितले होते.
अंतरा तळवडे येथील कॅपजेमिनी कंपनीत एप्रिलपासून नोकरी करत होती. शुक्रवारी तिला कंपनीतून घरी घेऊन जाणारी कंपनीची कॅब रात्री आली नाही. दुसऱ्या गाडीचा शोध घेण्यासाठी ती कॅनबे चौकातून पायी जात होती. त्या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंतराचा मृत्यू झाला.
कॉल रेकॉर्डची तपासणी...
अंतराच्या खूनप्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपीचे आणि अंतराचे मोबाईलवरून आणखी कोणाकोणाशी संभाषण झाले, याची माहिती घेण्यासाठी मोबाईल कॉल तपासण्याचे काम सुरू आहे.