पुण्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा भांडाफोड; तेरा अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:11 AM2023-01-13T10:11:03+5:302023-01-13T10:11:10+5:30
मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश
पुणे : मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना हे आदेश दिले. यात पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातील शाळांचा समावेश असून, दोन दिवसांत या शाळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सीबीएसई शाळा सुरू केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना त्यापाठोपाठ आता जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा भांडाफोड झाला आहे. या शाळा अनधिकृत असल्याने त्याची माहिती जिल्हा परिषदेला दिली जात नसल्याचे उघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळा तपासणीचे आदेश दिले. त्यातून राज्य सरकारची मान्यता नसतानाही त्या शाळा अद्याप सुरू ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे जिल्ह्यातील १३ शाळा अनधिकृत सुरू होत्या. राज्य सरकारची परवानगी नसतानाही त्या सुरू होत्या. अशा शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या १३ शाळा हवेली तालुक्यातील किरकटवाडी, लोणी काळभोर, आंबेगाव बुद्रूक तसेच मुळशी तालुक्यातील उरवडे, बावधन, हिंजवडी, जांभे-सागवडे, दत्तवाडी येथील आहेत. त्याशिवाय दौंड तालुक्यातील दौंड, कासुर्डी, लिंगाळी रोड आणि पुरंदर तालुक्यातील वीर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सांगितले.
यापूर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस देऊन तपासणी केली होती. त्यावेळी गेल्या वर्षी जिल्ह्यातील ४३ शाळा अनधिकृत असल्याने त्यांच्याविरोधात जिल्हा परिषदेने कारवाई केली होती. त्यापैकी २९ बंद असलेल्या शाळा होत्या. तर १४ शाळा सुरू होत्या. त्यापैकी चार शाळांनी प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे लोणी काळभोर, दौंड, हवेली तालुक्यांतील चार शाळांनी दंडाची रक्कम जिल्हा परिषदेकडे भरली.
''जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना अशा शाळांची तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे कारवाई सुरू आहे. - संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद''