पिंपरी महापालिकेने उघडल्या इंग्रजी शाळा
By Admin | Published: May 11, 2015 06:43 AM2015-05-11T06:43:34+5:302015-05-11T06:43:34+5:30
महापालिकेच्या शाळांतील मुलांची संख्या कमी होऊन त्या बंद पडत असल्याचे चित्र राज्यभरात आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका मात्र यास अपवाद ठरली आहे.
अमोल जायभाये, पिंपरी-चिंचवड
महापालिकेच्या शाळांतील मुलांची संख्या कमी होऊन त्या बंद पडत असल्याचे चित्र राज्यभरात आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका मात्र यास अपवाद ठरली आहे. या पालिकेने मुलांसाठी मोफत इंग्रजी शिक्षणाची सोय करून खासगी शाळांवर तोडगा काढला आहे. येथील पालिकेच्या शाळेत प्रवेशासाठी रांगा लागत आहेत.
महापालिकेच्या वतीने चिंचवड आणि भोसरी परिसरात इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा चालवल्या जातात. इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यासाठी पालकांना हजारो रुपयांचे शुल्क मोजावे लागते. शिवाय या शाळा मर्जीप्रमाणे नियम लादतात.
या पालिकेने मात्र इंग्रजी शिक्षणही निशुल्क सुरू केल्याने सर्वसामान्य पालकांना पर्याय मिळाला आहे. कोणतेही शुल्क न देता येथे आतापर्यंत सहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. शहरामध्ये या दोनच शाळा असल्यामुळे त्या आता अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आणखी चार शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यातील एक शाळा बोपखेल येथे सुरू
होणार आहे.
शिक्षणाच्या खासगीकरणाला पर्याय देत स्वत:हून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणारी ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे. इतर महापालिका व जिल्हा परिषदांनी हा आदर्श घेतल्यास खासगी शाळांना मोठा पर्याय उभा राहू शकतो.
आधी येईल त्याला प्रवेश मिळणार
४महापालिकेची पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सन २००३ मध्ये इंग्लिश मीडियम पिंपरी स्कूल या नावाने सुरू झाली. त्यानंतर २००५ मध्ये महात्मा फुले यांच्या नावाने चिंचवडमध्ये शाळा सुरू झाली. या शाळांत पूर्वप्राथमिक ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत.
४सुरुवातीला प्रतिसाद कमी होता. मात्र, आता या शाळांना मोठा प्रतिसाद आहे. जो अगोदर येईल त्याला प्रवेश हे येथील सूत्र आहे. शाळांत सर्व सुविधा मोफत दिल्या जातात.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर १४ शिक्षक
४इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी महापालिकेने १४ शिक्षकांची नियुक्ती केली आहे.
४गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांना वेळोवेळी अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाते. २००४ मध्ये या शाळांत ६४ पट होता. तो गतवर्षी बाराशेवर गेला.
ंखासगी इंग्रजी शाळांसाठी पालकांना मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागते. सर्वच पालक हे शुल्क भरू शकत नाहीत. त्यासाठी महापालिकेने मोफत इंग्रजी शाळा सुरू केल्या. या शाळा वाढवत नेण्याचा महापालिकेचा विचार आहे.- आशा उबाळे, प्रशासन अधिकारी,
शिक्षण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिका.