ओबामांसमोर संचलनाचा आनंद
By admin | Published: February 12, 2015 02:29 AM2015-02-12T02:29:18+5:302015-02-12T02:29:18+5:30
दिल्लीतील राजपथ येथे झालेल्या परेडमध्ये हवाई दलाच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान पिंपरी-चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय योगापट्टू सलोनी जाधवला मिळाला.
रिटा कदम, पिंपरी
दिल्लीतील राजपथ येथे झालेल्या परेडमध्ये हवाई दलाच्या महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान पिंपरी-चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय योगापट्टू सलोनी जाधवला मिळाला. हे संचलन २६ जानेवारीला झाले. या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमोर संचलनाचा मान मिळाल्याने विशेष आनंद झाल्याची भावना तिने ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.
सलोनीने दोन वेळा आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये ‘सुवर्ण पदक’ मिळविले आहे. तसेच तिला राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) माध्यमातून आणि हवाई दलाच्या महिला विभागाचे प्रमुख म्हणून संचलनाची संधी मिळाली. त्यानंतर २८ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्यासमोर झालेल्या संचलनामध्ये प्लॅटून कमांडर चषक मोदींच्या हस्ते मिळाला.
राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सलोनीचे मुबंईमध्ये स्वागत केले. या वेळी तिला ब्राँझ पदक व चषक देण्यात आला.
सोळा पारितोषिके
पुणे ते दिल्लीच्या प्रवासाबाबत सलोनी म्हणाली, ‘‘ दिल्लीच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्यात आयजीसीचे ११ कॅम्प घेतले होेते. यातून चार कॅम्प विजयी झाले. यात बेस्ट कॅन्डिीटेड हवाई दल म्हणून सलोनीची निवड झाली. औरंगाबादमध्ये झालेल्या स्पर्धेतून १६७ विद्यार्थ्यांचे निवड करण्यात आली. हे सर्व दिल्ली परेडमध्ये सहभागी झाले होते. दिल्लीतही विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली. या महाराष्ट्राची संस्कृती, सण चित्रांद्वारे दाखवण्यात आले. यात महाराष्ट्र संघाला १६वेळा पहिले पारितोषिक मिळाले.’’
शिरपेचात तुरा
दरम्यान, सलोनी को बुलावो, अरे ये सलोनी कौन?, आप महाराष्ट्र से होना... अशी चर्चा मान्यवरांच्या चहा पानात सुरू होती. त्यामुळे राज्याच्या शिरपेचात अनमोल तुरा रोवण्याचे काम सलोनीने केले.