लुटा सुखद प्रवासाचा आनंद; नव्या रुपात धावणार पुणे-सिकंदराबाद एक्सप्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:46 PM2017-12-23T18:46:44+5:302017-12-23T19:19:33+5:30
पुणे ते सिकंदराबाद दरम्यान सुरू असलेली शताब्दी एक्सप्रेस येत्या २५ डिसेंबरपासून नव्या रुपात धावणार आहे. पुणे विभागाच्या ‘प्रोजेक्ट स्वर्ण’अंतर्गत या गाडीच्या दहा डब्ब्यांची अंतरबाह्य सजावट करण्यात आली आहे.
पुणे : पुणे ते सिकंदराबाद दरम्यान सुरू असलेली शताब्दी एक्सप्रेस येत्या २५ डिसेंबरपासून नव्या रुपात धावणार आहे.
पुणे विभागाच्या ‘प्रोजेक्ट स्वर्ण’अंतर्गत या गाडीच्या दहा डब्ब्यांची अंतरबाह्य सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सुखद आणि मनमोहक प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.
पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला पी. यू. पेंटिंग करण्यात आले असून गाडीला आकर्षक ग्रेफाईट कोटींग करण्यात आले आहे. तसेच ही गाडी धूळ विरहीत असणार आहे. गाडीच्या सजावटीमुळे व आकर्षक बैठक व्यवस्थेमुळे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. पुणे स्टेशन येथून खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते पहाटे ५. ५० वाजता गाडीचा शुभारंभ होणार आहे. गाडीची बैठक व्यवस्था सुरेख व नावीन्यपूर्ण असून नवीन डब्यांमध्ये रेड कारपेट अंथरले आहे. त्याचप्रमाणे गाडीमध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या संस्कृतीचे व लोककलांचे दर्शन घडविणाऱ्या आर्कषक पेंटिंग लावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गाडीमध्ये सुगंधी वातावरण राहण्यासाठी विशेष यंत्रणा बसविण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरेही बसिविले आहेत.
दृष्टीहीन प्रवाशांसाठी ब्रेल लिपीमध्ये बैठक क्रमांकाची व्यवस्था केली असून नवीन मोबाईल चार्जर, आकर्षक परडे, एलईडी रिडिंग लॅम्प आणि डिजिटल घड्याळ लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी उच्च श्रेणी वर्ग प्रवाशी डब्यांमध्ये वायफाय व्यवस्था बसविण्यात आली आहे. गाडीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना विविध सुविधांची माहिती देणारा सूचना फलक लावण्यात आला आहे.
पुण्यातून सिकंदराबाद येथे धावणारी शताब्दी एक्सप्रेस पुण्यातून पहाटे ५.५० वाजता सुटणार असून सिकंदराबाद येथे २ वाजून २० मिनिटांनी पोहचणार आहे. तसेच सिकंदराबाद येथून २ वाजून ४५ मिनिटांनी सुटून पुण्यात ११ वाजून १० मिनिटांनी पोहचेल, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.