"निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या पण..."; लोणावळा दुर्घटनेनंतर पोलिसांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 10:03 AM2024-07-01T10:03:20+5:302024-07-01T10:03:29+5:30

लोणावळा, खंडाळा, पवनानगर भागातील कार्ला लेणी, भाजी लेणी, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, पवना धरणाचा परिसर, लायन्स पॉईंट, भुशी धरण, तुंगार्ली धरण, राजमाची किल्ला या परिसरामध्ये पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येत असतात....

Enjoy the beauty of nature but avoid going to dangerous places; Police instructions after the Lonavala tragedy | "निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या पण..."; लोणावळा दुर्घटनेनंतर पोलिसांच्या सूचना

"निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या पण..."; लोणावळा दुर्घटनेनंतर पोलिसांच्या सूचना

लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा खंडाळा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी येथील निसर्ग सौंदर्याचा, धबधब्यांचा आनंद जरूर घ्यावा मात्र हे करत असताना धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले आहे.

लोणावळा, खंडाळा, पवनानगर भागातील कार्ला लेणी, भाजी लेणी, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, पवना धरणाचा परिसर, लायन्स पॉईंट, भुशी धरण, तुंगार्ली धरण, राजमाची किल्ला या परिसरामध्ये पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येत असतात. पावसाळ्यामध्ये या सर्व परिसरातील हिरवेगार डोंगर त्यामधून फेसाळत वाहणारे धबधबे, तुडुंब भरलेली धरणे, डोंगरांमधून निघणारी धुक्याची चादर हा सर्व निसर्गाचा ठेवा पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी दरवर्षी विविध राज्यांमधून तसेच परदेशामधून पर्यटक येत असतात. या पर्यटकांमध्ये अनेक तरुण तरुणींचे तसेच महाविद्यालयीन मुला-मुलींचे समूह असतात.

या समूहांमधील काही अतिउत्साही मुले ही धोकादायक पद्धतीने पर्यटन करतात. यामधून आतापर्यंत धरणांमध्ये बुडून मयत होण्याच्या घटना, डोंगरदऱ्यांमध्ये पाय घसरून धबधब्यामध्ये पडल्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत. या वर्षीच्या पावसाळ्यात अशा दुःखद घटना टाळण्यासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे. लोणावळा शहर पोलीस स्टेशन व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने जागोजागी धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत.

लायन्स पॉईंट या ठिकाणी दरीच्या तोंडाला लोखंडी रेलिंग करण्यात आली आहे. राजमाची पॉईंट खंडाळा येथे देखील सुरक्षा जाळी लावण्यात आली आहे. पर्यटकांनी या रेलिंग व जाळीच्या पुढे जाण्याचा मोह टाळावा. सेल्फी घेण्यासाठी अनेक वेळा तरुण-तरुणी धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाऊन फोटो काढण्याचे प्रयत्न केले जातात तर धरणांमध्ये पाणीसाठा वाढलेला आहे, हे माहीत असताना देखील धरणांमध्ये पोहण्यासाठी उतरतात. यामधून अनेक प्राणांतिक घटना घडत आहेत. या घटना टाळण्यासाठी सुरक्षित पर्यटनाला पर्यटकांनी प्राधान्य द्यावे. प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व सुरक्षेबाबतच्या सूचनांचे पालन करावे. धरण, धबधबे, गड किल्ले, लेण्या या भागातील स्थानिक व्यावसायिक अनेक वेळा पर्यटकांना सूचना देण्याचा प्रयत्न करतात मात्र बेधुंद झालेले तरुण तरुणी या सूचनांकडे कानाडोळा करत, त्यांना उलट उत्तरे देत धोकादायक ठिकाणी जातात.

लोणावळा, खंडाळा, पवनानगर, आंदर मावळ भागात निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केल्याने पावसाळ्यातील येथील निसर्ग सौंदर्य खुलुन दिसते. या निसर्गाचा पर्यटकांनी आनंद घ्यावा व निसर्ग सौंदर्य कायम आपल्या डोळ्यात साठवून ठेवावे. मागील काही वर्षांमध्ये येथील पर्यटनाचा ट्रेण्ड बदलला आहे. पर्यटनस्थळी जायचे म्हणजे केवळ धिंगाणा घालायचा, नशा करायची, वाहने कशीही चालवायची असे प्रकार दिसून येत आहेत. मात्र हे धोकादायक पर्यटन जीविताला बाधा पोहचविणारे असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, आपल्या मागे आपली कोणीतरी घरी वाट पहात आहे, याची जाणीव ठेवावी व सुरक्षित पर्यटन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Enjoy the beauty of nature but avoid going to dangerous places; Police instructions after the Lonavala tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.