पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद! पर्यटकांसाठी खुशखबर; लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 12:24 PM2023-07-01T12:24:13+5:302023-07-01T12:29:05+5:30
पर्यटकांसाठी पावसाळ्यात सर्वाधिक आकर्षणाची शहरे लोणावळा खंडाळा तर वर्षाविहारासाठी भुशी डॅम
लोणावळा : पर्यटकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे की, लोणावळ्यात भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा खंडाळा ही शहरे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. व येथील भुशी धरण हे पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण आहे. धरणाच्या सांडव्यावरुन वाहणार्या पाण्यात बसून वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्यात येत असतात. धरणाच्या सांडव्याला लागून पायर्या असून या पायर्यांवरुन धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी वाहत असते. लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले की खर्या अर्थाने पावसाळी पर्यटनाला सुरुवात होते. अनेक देश विदेशातील पर्यटक धरणाच्या पायर्यांवर बसण्याचा व या परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
30 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भुशी धरण ओव्हरफ्लो झाले व परिसरातील व्यावसायकांनी जल्लोष केला. कारण पावसाळी सिझनच्या चार महिने व्यावसायावर येथील नागरिकांचे वार्षिक अर्थचक्र अवलंबून असते. शनिवारी सकाळीच धरण भरल्याची गोड बातमी समजल्याने शनिवार व रविवार दोन्ही दिवस धरणावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर वर्षाविहाराचा आनंद घेताना काळजी घ्यावी, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घ्या, महिला, मुले व वयस्कर यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, वाहने चालविताना सावकाश चालवा, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन वजा इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिला आहे.