‘मस्ती की पाठशाला’ उपक्रमातून ऑनलाइन आनंददायी शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:37+5:302021-06-19T04:08:37+5:30
कदमवाकवस्ती : शाळा थांबल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी अॅक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र (एटीएम) या राज्यस्तरीय शिक्षकांच्या समूहाने ...
कदमवाकवस्ती : शाळा थांबल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी अॅक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र (एटीएम) या राज्यस्तरीय शिक्षकांच्या समूहाने राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांसाठी एटीएम ‘मस्ती की पाठशाला’ हा नावीन्यपूर्ण ऑनलाइन उपक्रम सुरू केला असून, राज्यभरातील हजारो विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊन आनंददायी शिक्षण घेत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात राहणे गरजेचे आहे, हे ओळखून राज्यस्तरीय काही शिक्षकांनी एकत्र येत हा उपक्रम सुरू केला आहे. त्यास विद्यार्थ्यांचादेखील प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सोशल मीडियावर ग्रुप तयार केले आहेत.
प्रत्यक्ष ऑनलाइन चॅनलद्वारे कार्यक्रम प्रक्षेपित करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. मुलांच्या वयोगट व आवडीनुसार वेगवेगळ्या विषयांची निवड केली आहे. त्यात बाहुलीनाट्य, गोष्टी, कागदकाम, चित्रकला, मुलाखत, आहार, प्राणायाम, विज्ञानातील गमती-जमती, नृत्य, कविता, अभिनय संवाद आदी विषयांचा समावेश आहे.
दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत चालणाऱ्या या उपक्रमात २७ मे ते ५ जून या पहिल्या टप्प्यात दहा हजार विद्यार्थी सहभाग घेतला. दुसऱ्या टप्प्यात १५ जून ते २९ जून शाळा पूर्वतयारीबाबत शिबिर घेण्यात येणार आहे. तर १ जुलै ते ३० जुलैपर्यंत उजळणी वर्ग घेण्यात येऊन १ ऑगस्टपासून पुन्हा ऑनलाइन शिक्षणास प्रारंभ करण्यात येणार आहे.
लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडबापडळ येेथील विद्यार्थीदेखील मस्ती की पाठशाला या उपक्रम रमले आहेत.
लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर व शाळा व्यवस्थापन समिती लाडबापडळ यांनी विद्यार्थ्यांना माहिती व मार्गदर्शन करून शिक्षक चित्रा गवारे व तुषार चौधरी यांच्या मदतीने मार्गदर्शनाने या वर्गास विद्यार्थी सहभागी करून शाळेतील गुणवत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न केले.