रहिवासी पुराव्यासाठी आधार कार्ड पुरेसे
By Admin | Published: May 11, 2017 04:39 AM2017-05-11T04:39:19+5:302017-05-11T04:39:19+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांचे मागणी सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांचे मागणी सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. अर्जासोबत शहरातील रहिवासी असल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. त्यावरून नागरिकांनी गोंधळून जाऊ नये. अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून केवळ आधारकार्ड जोडले, तरी पुरेसे आहे. त्यामुळे नागरिकांनी रहिवासी दाखला किंवा उत्पन्न दाखला मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये पळापळ करून स्वत:ची पिळवणूक करून घेऊ नये. महापालिकेने संकेतस्थळावर अर्ज मोफत उपलब्ध करून दिले आहेत. अर्ज भरल्यानंतर त्यासोबत आधारकार्ड जोडून महापालिकेकडे जमा करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
या संदर्भात आमदार जगताप म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना माफक किमतीत नवीन घर, तसेच जुने घर असल्यास दुरुस्तीसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. पंतप्रधानांची ही महत्त्वाकांक्षी योजना पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील किती जणांना घरांची आवश्यकता आहे, हे निश्चित होणे आधी गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात घरांचे मागणी सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या या संकेतस्थळावर प्रधानमंत्री आवास योजना नावाची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक केल्यास प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. हा अर्ज डाऊनलोड करून नंतर तो सविस्तर भरून पुन्हा महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जमा करावयाचा आहे.