Pune: रागाने पेटलेल्या पतीने पत्नीच्या गाड्या पेटवल्या; घटस्फाेटासाठी अर्ज केल्याचे समजल्याने संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 11:33 AM2023-03-15T11:33:26+5:302023-03-15T11:33:33+5:30
रागाने संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या गाड्या पेटवून दिल्या...
पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीने नांदण्यास येण्यास नकार देत तिने घटस्फोटासाठी अर्ज केला. याची माहिती कळताच रागाने संतप्त झालेल्या पतीने पत्नीची गाडी पेटवून दिली. यात एक मोटार, रिक्षा तसेच ४ दुचाकी जळून खाक झाल्या.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २च्या पथकाने पतीला अटक केली. टेरेन्स डॉमनिक जॉन (वय ३१, रा. अश्रफनगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी टेरेन्स याच्या पत्नीने कोंढवापोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील आश्रफनगरमध्ये सोमवारी पहाटे ५ वाजता घडला.
टेरेन्स आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यामुळे पत्नीने नांदण्यास नकार दिला होता. तसेच तिने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यामुळे टेरेन्स चिडला होता. त्याने पत्नीची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिली. त्याच्या आजूबाजूला असलेली एक मोटार, रिक्षा आणि चार दुचाकीही पेटवून त्या जळून खाक झाल्या. या घटनेनंतर टेरेन्स पळून गेला होता. पसार झालेला टेरेन्स कोंढव्यातील लुल्लानगर भागात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस कर्मचारी पुष्पेंद्र चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, कादीर शेख, समीर पटेल, पुष्पेंद्र चव्हाण यांनी सापळा लावून टेरेन्सला ताब्यात घेतले.