मनोरंजन विश्व नव्या जोमाने नक्कीच भरारी घेईल : क्षितिज पटवर्धन, लेखक आणि गीतकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:42+5:302021-03-07T04:11:42+5:30
कोरोनाचा सुरुवातीचा काळ हा कलाकारांसाठी भीती आणि चांगल्या गोष्टी मार्गी लागत असताना असं अचानकमध्ये काय झालं असं वाटण्यात गेला. ...
कोरोनाचा सुरुवातीचा काळ हा कलाकारांसाठी भीती आणि चांगल्या गोष्टी मार्गी लागत असताना असं अचानकमध्ये काय झालं असं वाटण्यात गेला. त्याची तीव्रता सुरुवातीला फारशी जाणवली नाही. पण जशी त्याची व्याप्ती वाढायला लागली तशी आता हे आपल्या जवळपास यायला लागलंय असं वाटायला लागलं. माणूस हा मूलभूत गरजांनंतर मनोरंजनाकडे वळतो. याचा अर्थ मनोरंजन क्षेत्र हे शेवटच्या पायरीवर आहे पण याचा परिणाम सर्वप्रथम या क्षेत्रावरच होतो. हा केवळ आजार नाही तर याचा संपूर्ण जीवनावर परिणाम होणार आहे हे जाणवलं. आपण घरात बसून सोशल डिस्टन्सिंग पाळून काटकसर करायला हवी याची जाणीव झाली. आजवर कोणत्याच माणसाला एवढा मोकळा वेळ मिळाला नव्हता. तो कोरोना काळात मिळाला. खूप नवीन गोष्टी सर्वांनाच करायला मिळाल्या. जे काही मिळालं त्यात कृतघ्न राहायला हवं. आपल्याला काय हवंय आणि किती कमावायंचय हे कळलं. भीती ते वास्तवाकडे जाण्याचा हा प्रवास होता. माणसाचा माणसाशी संवाद, मित्रांनी मारलेली मिठी या छोट्या-छोट्या गोष्टींची किंमत कळाली. कोरोनाने एक धडा शिकविला. प्रत्येक माणसाने आपली मागणी किती आहे, मला एवढंच लागतं असं गृहीत धरलं तर आपण समाज किंवा पर्यावरण यासाठी काहीतरी नक्कीच करू शकतो याची जाणीव झाली. आपण शासनावरून अवलंबून राहाणं टाळायला हवं. पडद्यामागच्या कलाकारांना मदतीची गरज आहेचं यात दुमत नाही. पण प्रस्थापित कलाकार, निर्मात्यांना त्याची फारशी गरज वाटत नाही. कोरोना काळात श्रमाला प्रतिष्ठा आली. ‘बुद्धिजीवी वर्ग हा श्रमजीवी’ झाला. प्रतिष्ठेपेक्षा पोट महत्त्वाचं आहे हे सर्वांना कळून चुकलं ही जमेची बाजू म्हणता येईल.
----------------------------