पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:24+5:302021-07-25T04:09:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आगामी महापालिका स्वबळावर लढवण्याचा इरादा जाहीर करतानाच प्रभाग दोन उमेदवारांचे असतील, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष ...

Enthusiasm in Congress after Patole's declaration of independence | पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसमध्ये उत्साह

पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसमध्ये उत्साह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आगामी महापालिका स्वबळावर लढवण्याचा इरादा जाहीर करतानाच प्रभाग दोन उमेदवारांचे असतील, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यामुळे शहर कॉंग्रेसमध्ये चैतन्य आले असून अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बहुतेकांनी लढण्याची तयारी चालू केली आहे.

नाना पटोले शुक्रवारी पुण्यात होते. त्यांनी एक-दोन नाही तर पाच कार्यक्रम घेतले. याआधी दोन-दोन वर्षे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पुण्यात फिरकतही नव्हते. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांचे महिनाभरात शहरात दोनतीन वेळा येणे व नेते-पदाधिकाऱ्यांशी फड जमवून गप्पा मारणे यामुळे पक्ष कार्यकर्ते सुखावले आहेत.

‘नाना म्हणजे भारी असामी’ असे कार्यकर्ते बोलत आहेत. आजीमाजी नगरसेवकांच्या बैठकीत नानांनी सरळ सांगून टाकले की आपण शंभर टक्के स्वबळावरच लढणार. महाविकास आघाडीत जागा वाटपात काँग्रेसला गुंडाळले जाईल अशी धाकधूक असणारे इच्छुक नानांच्या या आश्वासनामुळे आनंदले आहेत. एरवी ओस असलेल्या काँग्रेस भवनमधील राबता यातून वाढला असून शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या टेबलभोवतीची गर्दीही बोलकी होऊ लागली आहे.

जुन्या-नव्या नेत्यांनाही नानांनी बऱ्याच कानपिचक्या देत काही कानमंत्रही दिल्याची चर्चा आहे. तुमच्या शहरात तुमचीच मर्जी चालणार, पण त्यासाठी कष्ट करा, नुसतीच शायनिंग चालणार नाही, असे नानांनी बजावले असल्याची माहिती मिळाली. मित्रांना किती जवळ आणायचे, त्यातून फायदा होतो आहे की नुकसान हे तुम्ही ठरवायचे, असे सांगत त्यांनी ‘राष्ट्रवादी’पासून दोन हात लांबच राहण्याचा सल्ला अप्रत्यक्षपणे दिल्याचे एका नेत्याने सांगितले.

आजी-माजी नगरसेवकांनाही त्यांनी तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही निवडून याच, पण तुमच्याबरोबर दुसरा कसा येईल याचीही काळजी करा, असे सांगितले. एकचा प्रभाग होणार नाही, तसे केले तर ‘मनी-मसल-पॉवर’ असलेले लोकच येतात. त्यामुळे दोनचा प्रभाग योग्य असून त्यादृष्टीने कामाला लागा असा सल्ला पटोलेंनी दिला.

चौकट

“स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी आहे. पटोलेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांच्या मन:स्थितीत नक्कीच फरक पडला आहे. भाजपाचा पाडाव हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

-रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस

चौकट

“पुणे कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. महापालिका निवडणूक पूर्ण गांभीर्याने आणि जिंकण्यासाठीच लढू.”

मोहन जोशी- प्रदेश उपाध्यक्ष.

Web Title: Enthusiasm in Congress after Patole's declaration of independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.