कॅँन्टोन्मेंटच्या इंग्रजी शाळेसाठी आता प्रवेशशुल्क; पालकांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 03:48 AM2018-12-12T03:48:34+5:302018-12-12T03:48:59+5:30
पायाभूत सुविधांवर खर्च केल्यामुळे करणार आकारणी
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रवींद्रनाथ टागोर इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्यावर बराच खर्च झाला. त्यामुळे शाळा आता प्रत्येक विद्यार्थ्यांकडून शुल्क घेणार असून, येत्या मार्च २०१९ पर्यंत ते भरायचे आहे. याबाबतची माहिती पालकांना दिल्यानंतर त्यांच्यामध्ये संताप निर्माण झाला आहे. आतापर्यंत मोफत शिक्षण दिले जात होते. मग आता पैैसे कशासाठी, आता सवाल पालक उपस्थित करीत आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या टागोर शाळेचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. नवीन इमारत व इतर सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यावर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. परिणामी चांगल्या सोयी-सुविधा दिल्या जात असल्याने शाळा विद्यार्थ्यांकडून शुल्क घेणार आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. प्रवेशशुल्क किंवा गणवेशासाठी देखील पैैसे घेतले जात नाहीत. परंतु, आता मुलांना वार्षिक ३००० रुपये व मुलींना २५०० रुपये शुल्क भरण्यास सांगण्यात आले आहे.
या शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने बोर्डाने केलेली शुल्कवाढ तत्काळ रद्द करावी. एकीकडे सरकार शिक्षण अधिकार कायदा (आरटीई) व सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत शिक्षणाचे आश्वासन देत असताना कॅन्टोन्मेंट बोर्ड मात्र याचा विरोधाभास करत असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे, असे कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बोर्डाची आर्थिक स्थिती नाजूक...
बोर्डाची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून करोडो रुपयांची थकबाकी येणे आहे.
बोर्डाचे उत्पन्न खर्चापेक्षा कमी असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार करणेही अवघड जात आहेत.
इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे. प्रवेश मर्यादित व्हावेत, म्हणून हे शुल्क घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
माझा मुलगा या शाळेत दुसरीमध्ये शिकत आहे. आतापर्यंत कधीच शुल्क घेण्यात आले नाही. पण आता आम्हा पालकांची सभा घेऊन आम्हाला शुल्क भरण्यासाठी सांगण्यात आले आहे. शाळेची इमारत नवीन तयार केली असून, त्यासाठी मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे हे शुल्क भरावे लागेल, असे शाळेतर्फे सांगण्यात आले आहे. मार्च २०१९ पर्यंत पैसे भरण्यास मुदत दिली आहे.
- जितेश मोहिते, पालक
शाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे बराच खर्च झाला आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी बोर्डातर्फे माफक शुल्क आकारण्याचा विचार केला जात आहे. येत्या शैैक्षणिक वर्षापासून अगदी कमी शुल्क लागू करण्याबाबतची माहिती पालकांची सभा घेऊन दोन महिन्यांपूर्वीच दिली होती.
- प्रियांका श्रीगिरी, उपाध्यक्ष,
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड