प्रवेशोत्सवाने विद्यार्थी भारावले
By admin | Published: June 15, 2015 11:59 PM2015-06-15T23:59:15+5:302015-06-15T23:59:15+5:30
महापालिकेच्या तसेच सर्व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके, गणवेश देऊन स्वागत केले.
पिंपरी : महापालिकेच्या तसेच सर्व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तके, गणवेश देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतर सोमवारपासून शाळा सुरू झाल्या. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळाली. गेले दीड महिना सुटीमुळे आळसावलेली मुले आज शाळेत येताना मोठ्या उत्साहात दिसत होती. अनेक दिवस मित्रांपासून दूर असल्यामुळे त्यांना भेटण्याची हुरहुर विद्यार्थ्यांना लागली होती. शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना वेळेत शाळेत सोडविण्यासाठी पालकांचीही तारांबळ उडाली होती. सर्वच शाळांसमोर पालकांची गर्दी पाहायला मिळाली. सुटीत कुठे गेला होता, काय-काय मजा केली, असे उत्सुकतेपोटी मुले एकमेकांना विचारत होती. शाळा आवारात वेळेआधीच गर्दी झाली होती.
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्वच शाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. महापालिकेच्या तळवडे, संत तुकारामनगर, पुनावळे, पिंपळे गुरव येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गणवेश, पुस्तके, गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन महापौर शकुंतला धराडे यांनी स्वागत केले. या वेळी महापालिका आयुक्त राजीव जाधव, शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, प्रशासन अधिकारी आशा उबाळे, शिक्षण मंडळाचे सदस्य उपस्थित होते. महापालिकेच्या इतर शाळांमध्ये स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थांची मेजवाणी मिळाली. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच कार्यक्रमांची विद्यार्थ्यांबरोबरच पालक व शिक्षक वर्गालाही उत्सुकता होती. त्यामुळे शाळेचा परिसर मुलांनी फुलून गेला होता. पालिकेच्या शाळांसह खासगी शाळांमध्येही स्वच्छता ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश देण्याचे नियोजन आधीच पूर्ण झाल्यामुळे गोंधळ उडाला नाही. शिशुवर्गामध्ये दाखल होणारी मुले पालकांनी बिलगुनच राहत होती. पालक सोडून जाताना रडून गोंधळ करीत होते. शिक्षक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते. तरीही ते ऐकण्यास तयार नसल्याने परिसरात किलकिलाट सुरू होता.