उद्योजक गायकवाड पित्रा-पुत्रासह आठ जणांवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:18 AM2021-08-17T04:18:14+5:302021-08-17T04:18:14+5:30

पुणे : औंध परिसरातील उद्योजक नानासाहेब गायकवाड पिता -पुत्रासह ८ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) नुसार कारवाई ...

Entrepreneur Gaikwad mocks eight people, including his father and son | उद्योजक गायकवाड पित्रा-पुत्रासह आठ जणांवर मोक्का

उद्योजक गायकवाड पित्रा-पुत्रासह आठ जणांवर मोक्का

Next

पुणे : औंध परिसरातील उद्योजक नानासाहेब गायकवाड पिता -पुत्रासह ८ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे.

नानासाहेब गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (रा. एनएसजी हाऊस, औंध), सोनाली दीपक गवारे, दीपक निवृत्ती गवारे (दोघे रा. शिवाजीनगर), राजू दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा. पिंपळे निलख), सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (रा. विधाते वस्ती, औंध) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. यापैकी नानासाहेब गायकवाड, त्यांचा पुत्र गणेश गायकवाड तसेच वाळके बंधू हे फरार आहेत.

नानासाहेब गायकवाड याच्यावर कौटुंबिक छळासह खंडणी, जिवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई यांचा देखील यामध्ये समावेश आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यापूर्वीच गायकवाड कुटुंबावर मोका’नुसार कारवाई केली आहे, त्यापाठोपाठ पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही त्यांच्याविरुद्ध मोका’चा बडगा उगारला.

आरोपीनी बेकायदा व्याजाने पैसे देऊन ते वसूल करण्यासाठी पिस्तुलाचा धाक दाखविण्यासाठी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच, धमकी देऊन जमिनीच्या कागदावर जबरदस्तीने सह्या घेतल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या टोळीचा प्रमुख नानासाहेब गायकवाड असून इतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत गुन्हे केले आहेत. या संघटित टोळी करून आर्थिक फायदा मिळविण्यासाठी विविध गुन्हे केले आहेत. या टोळीची परिसरात दहशत होती. त्यामुळे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी या टोळीच्या विरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांकडे पाठविला होता. त्याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी मंजुरी दिली.

सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रस्ताव तयार केला होता.

Web Title: Entrepreneur Gaikwad mocks eight people, including his father and son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.