उद्योजक उदय चेरेकर यांचे कोरोनाने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:11 AM2021-04-12T04:11:19+5:302021-04-12T04:11:19+5:30
पुणे : श्री सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक- संचालक उदय चेरेकर ( वय ५९) यांचे कोरोनाने निधन झाले. सुमारे ...
पुणे : श्री सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक- संचालक उदय चेरेकर ( वय ५९) यांचे कोरोनाने निधन झाले. सुमारे दीड ते दोन तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आयसीयू मध्ये बेड मिळण्यासाठी मुलगी आणि नातेवाईकांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांना बेड उपलब्ध होऊ शकला नाही. ४० जण वेटिंग लिस्टमध्ये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. हडपसरच्या पूनावाला मेमोरियल रुग्णालयातून त्यांना सह्याद्रीमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
चेरेकर यांनी मुंबईच्या व्हीजेटीआय मधून मेकॅनिकल अभियंता म्हणून पदवी मिळविली. हायड्रॉलिक पॉवर पॅक डिझाइन विषयामधील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. स्वतःच्या नावीन्यपूर्ण डिझाईन्ससाठी डॉ. पार्के पुरस्काराचे मानकरी ठरल्यापासून ते विविध पुरस्कारांच्या निवड पॅनेलमध्ये त्यांचा समावेश होता. तरुण पिढीसाठी ते एक आदर्श व्यक्तिमत्व होते. एकही अशी ऑटोमोबाईल कंपनी सापडणार नाही जिथे त्यांचे हायड्रॉलिक पॉवर पॅक वापरले गेले नसतील. टाटा, बजाज, मर्सिडीज, जॅगवार सारख्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये त्यांची मशिन्स वापरली गेली आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसह ऑटोमोबाईल क्षेत्रात शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांची पत्नी आणि मुलगी देखील कोरोनाग्रस्त असल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
....