कृषी पदवीचे प्रवेशही फक्त सीईटीच्या गुणांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 06:06 AM2019-06-10T06:06:46+5:302019-06-10T06:06:50+5:30
व्यावसायिक विषय, एनसीसी, एनएसएसचाही आधार
पुणे : राज्यातील कृषी विद्यापिठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये कृषी पदवी अभ्यासक्रमांना या वर्षीपासून केवळ सीईटीतील गुणांवर प्रवेश दिले जाणार आहेत. बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. यापूर्वी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये केवळ सीईटीच्या गुणांवर प्रवेश मिळत होता. आता त्यात कृषी अभ्यासक्रमांचीही भर पडली आहे.
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मागील वर्षी पहिल्यांदाच या प्रक्रियेत ‘कृषी’चा समावेश करण्यात आला. पहिलेच वर्ष असल्याने ‘कृषी’साठी बारावीचे ३० टक्के व सीईटीचे ७० टक्के गुण ग्राह्य धरण्यात आले होते. म्हणजे विद्यार्थ्याला बारावीला ७० टक्के गुण असतील तर ३० टक्क्यांप्रमाणे त्याचे २१ गुण आणि सीईटीला ६० टक्के गुण असतील तर त्याचे ७० टक्क्यांनुसार ४२ गुण एकत्रित करण्यात आले. त्यानुसार गुणवत्ता यादीच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी केवळ सीईटीचे गुण ग्राह्य धरण्यात आले. यावर्षी कृषीसाठीही सीईटीचेच गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक (शिक्षण) हरिहर कौसडीकर यांनी दिली.
बारावीचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नसले तरी शेतजमीन (१२ टक्के), बारावीतील व्यावसायिक विषय (१० टक्के), राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा स्पर्धा, वादविवाद, निबंध, वकृत्व या राज्यस्तरीय स्पर्धांचे (२ टक्के) गुण विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत. पुढील वर्षीपासून हे गुणही न देण्याबाबत विचार सुरू आहे. अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांना हे गुण मिळत नाहीत. कृषी पदवीमध्ये प्रवेशासाठी बारावी (विज्ञान) च्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण व खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण अनिवार्य आहेत. प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना या www.mahacet.org संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर या www.maha-agriadmission.in संकेतस्थळावर प्राधान्यक्रम व इतर माहिती भरायची आहे. प्रवेश प्रक्रियेंतर्गत चार आॅनलाईन प्रवेश फेºया राबविल्या जाणार आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धांचे गुण पूर्वीप्रमाणेच
बारावीचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नसले तरी शेतजमीन (१२ टक्के), बारावीतील व्यावसायिक विषय (१० टक्के), राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा स्पर्धा, वादविवाद, निबंध, वकृत्व या राज्यस्तरीय स्पर्धांचे (२ टक्के) गुण विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत. पुढील वर्षीपासून हे गुणही न देण्याबाबत विचार सुरू आहे.