प्रवेशाची काळजी मिटणार
By Admin | Published: July 23, 2015 04:32 AM2015-07-23T04:32:54+5:302015-07-23T04:32:54+5:30
विविध कारणांमुळे आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी न झालेले, चारही प्रवेश फेऱ्यांत कुठेही प्रवेश न मिळालेले, यादीत नाव येवूनही प्रवेश न घेतलेल्या
पुणे : विविध कारणांमुळे आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी न झालेले, चारही प्रवेश फेऱ्यांत कुठेही प्रवेश न मिळालेले, यादीत नाव येवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रवेशाची संंधी मिळणार आहे. केंद्रीय प्रवेश समितीच्यावतीने चौथ्या फेरीअखेर रिक्त राहणाऱ्या जागांवर या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पाचवी विशेष आॅनलाईन फेरी घेतली जाणार आहे. शाखा बदल, माध्यम बदल, राज्य शिक्षण मंडळाकडून पुनर्तपासणीत गुणांमध्ये वाढ झालेले तसेच लांबचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीत अर्ज करता येणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून बुधवारी चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या यादीतील विद्यार्थ्यांना दि.२३ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे. तिसऱ्या फेरी अखेरपर्यंत एकूण ४८ हजार ४४७ विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश झाले आहेत. तर चौथ्या फेरीत १ हजार ३८२ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर रिक्त जागांचा जागांचा प्रत्यक्ष आकडा समोर येईल.
सध्या एकूण १५ हजार ७७२ जागा रिक्त आहेत. या जागांवर प्रवेशासाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी तसेच मार्चच्या परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निकालानंतर प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष व विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.
अकरावीत प्रवेशासाठी पाचवी विशेष फेरी अखेरची असणार आहे. त्यामुळे या फेरीमध्ये उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्यामुळे आॅनलाईन अर्ज भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष फेरीमध्ये बेटरमेंटची संधी देण्यात येणार नाही. तसेच कोणतीही प्रवेश फेरी असणार नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी रिक्त जागा व कट आॅफ पाहूनच विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरावेत, असे जाधव यांनी सांगितले.