पर्यावरण म्हणजे शब्दांचे बुडबुडे; पुणे महापालिकेतील सभेस आयुक्तांसह अधिकाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:04 PM2018-01-17T13:04:04+5:302018-01-17T13:07:02+5:30
पुणे शहराच्या पर्यावरण अहवालावर आयोजित सर्वसाधारण सभेत केवळ शब्दांचे बुडबुडे फुटले. आयुक्तांसह बहुसंख्य अधिकाऱ्यांनी सभेकडे पाठ फिरवली.
पुणे: शहराच्या पर्यावरण अहवालावर आयोजित सर्वसाधारण सभेत केवळ शब्दांचे बुडबुडे फुटले. आयुक्तांसह बहुसंख्य अधिकाऱ्यांनी सभेकडे पाठ फिरवली.
महापौर मुक्ता टिळक यांनी साडेअकरा वाजता सभेचे कामकाज सुरू केले. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गंभीर विषय आहे, त्यावर सर्वांना बोलू द्यावे असे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना सूचवले. त्यांनी विषय आज मंजूर करायचा आहे, वेळ होईल. आमचे आठ तुमचे तीन काँग्रेसचे दोन असे करू म्हणून सांगितले. तुपे यांनी ते अमान्य करत तुमच्याच लोकांना बोलू द्या आम्ही कोणीच बोलणार नाही अशी भूमिका घेतली.
त्यानंतर सुरूवात ज्योत्स्ना एकबोटे यांनी केली. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने शहरात विविध आजारांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यांच्या भाषणानंतर गोपाळ चिंतल यांनी तब्बल तासभर बोलंदाजी केली. पंतप्रधानांपासून शहरातील आमदारांपर्यत अनेकांची नावे घेत त्यांनी भाजपाचे गुणगान केले. कंटाळलेल्या सदस्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी भाषण सुरूच ठेवले. अधिकाऱ्यांवर टीका करत त्यांनी महापौरांनी स्मार्ट सिटी व महापालिकेत सुरू असलेल्या वादावर तोडगा काढावा असे सांगितले.
माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी काही अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित करत शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत. त्यासाठी जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. वाहनांच्या हॉर्नला लगाम घालण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या. मेट्रोचे काम सुरू असताना कर्वे रस्त्यावरील वाहतूक व पर्यावरण यांची वाट लागणार असल्याने त्याचे निराकरण करण्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी केली.
शहराध्यक्षांची सभेला हजेरी
भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली. पत्रकार गॅलरीत येऊन ते सर्व सदस्यांची भाषणे काळजीपूर्वक ऐकत होते. त्यामुळे भाजपाच्या नव्या सदस्यांमध्ये बोलण्याची अहमहिका लागली होती. अनेक सदस्यांनी जवळच्या पत्रकार मित्रांना फोन करून बोलण्यासाठी मुद्दे घेतले. महापौर व सभागृह नेते भिमाले यांच्याकडे भाषण करण्याची इच्छा व्यक्त केली.