विद्यार्थ्यांना लागणार पर्यावरणाची गोडी
By Admin | Published: June 28, 2015 12:09 AM2015-06-28T00:09:11+5:302015-06-28T00:09:11+5:30
महापालिकेच्या माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत, यासाठी ‘पर्यावरण शिक्षण प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे.
सुवर्णा नवले, पिंपरी
महापालिकेच्या माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत, यासाठी ‘पर्यावरण शिक्षण प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे. १ जुलैपासून १८ शाळांमध्ये प्रथमच हा प्रकल्प महापािलका पर्यावरण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. अभ्यासात पर्यावरणाचा विषय असताना विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयात गोडी निर्माण व्हावी, जंगलभ्रमंती, विविध वृक्षांची माहिती, जल व मृदसंवर्धन या विषयांची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पर्यावरणतज्ज्ञ देणार आहेत.
महापालिकेच्या माध्यमिक वर्गाच्या इयत्ता ५वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पर्यावरणाच्या सान्निध्यात राहून पर्यावरणाचे धडे मिळणार आहेत. यासाठी महापालिका पर्यावरण विभागाने या प्रकल्पावर ७ लाख रुपये खर्च केला आहे.
पर्यावरण शिक्षण प्रकल्पाचे मोफत धडे देण्यात येणार आहेत. तसेच, माहितीसाठी पर्यावरण पुस्तिका तयार केली जाणार आहे. यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. प्रतिशाळा २ विद्यार्थी प्रतिनिधीची नियुक्ती होणार आहे. आयुक्त राजीव जाधव यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हे कामकाज पर्यावरणप्रेमी संस्था पाहणार आहे. विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून पर्यावरण शिक्षण प्रकल्पाची माहिती देण्यात येणार आहे. याकरिता १०० विद्यार्थी एका वेळी निवडण्यात येणार आहेत, असे महापालिका शाळेचे १८०० ते २ हजार विद्यार्थी एका वेळी सहभागी होणार आहेत.
वर्षाला एक याप्रमाणे वर्षाचे १२ कार्यक्रम या उपक्रमांतर्गत राबविले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जनजागृतीच्या माध्यमातून स्थानिक जैवविविधता या विषयावर पर्यावरणाच्या समस्या व उपाय, शहरातील परिसराची ओळख, परिसरातील पक्षी, शेती, वन्यजीव व वनस्पती यांचे परस्परसंबंध व महत्त्व याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. दुसऱ्या सत्रात भटकंतीतून पक्षी निरीक्षण, उद्यानांचे महत्त्व सांगितले जाणार आहे. आॅगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांना निसर्ग भटकंती अनुभवता येणार आहे. प्रत्यक्षात निसर्गाचे संतुलन कसे राहते. त्याचबरोबर तलाव, ओढा, जंगल यांचा जलाशयाशी असणारा सहसंबंध सांगितला जाणार आहे. समवेत विद्यार्थ्यांना परिसरातील कचरा व्यवस्थापन सांगितले जाणार आहे. पर्यावरणपूरकतेसाठी प्लॅस्टिक वापर कसा टाळावा, दैनंदिन जीवनात हिरव्या वनस्पतीचे महत्त्व व आरोग्याच्या दृष्टीने वृक्षारोपण कोणते करावे, असे वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना काही प्रमाणात स्लाईड शोच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. पक्षी जैवविविधता व शेतीचे आर्थिक परस्पर संबंध समजावून सांगितले जाणार आहेत. शेतीतील काही अनोखे फं डे यामध्ये असणार आहेत. उदाहरणार्थ उसाच्या पाचटाचा नक्की कशा प्रकारे उपयोग केला जातो? अशी काही वेगळ्या प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे, ज्याचा सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करता येईल. वेळोवेळी आवश्यक तेनुसार पर्यावरणविषयक माहितीपटही विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना तिक ोणा व लोहगडाची सफ र अनुभवण्यास मिळणार आहे. या सर्व उपक्रमांचे नियोजन प्रत्येक शाळांचे मुख्याध्यापक पाहणार आहेत व महिन्याचा अहवाल पर्यावरण विभागाकडे देण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाच्या साह्याने याचे कामकाज चालणार आहे. वर्षभरानंतरच्या उपक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांपैकी ५ जून २०१६ ला पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून ५ विद्यार्थ्यांचा पर्यावरण शिक्षण पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
मागील वर्षीच पर्यावरण शिक्षण प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली होती. या वर्षीच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे शिक्षण मिळावे, हा आमचा हेतू आहे. विद्यार्थ्यांचा पर्यावरण बुद्धिगुणांक वाढावा, हा मुख्य उद्देश आहे. वातावरणातील बदल, सभोवतालच्या पर्यावरणातील जैवविविधताही अनुभवता येणार आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पर्यावरणाची सफ र दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना या माध्यमातून पर्यावरणाची गोडी निर्माण होईल.
- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता