पर्यावरणस्रेही साहित्य संमेलन गुरुवारी
By admin | Published: January 3, 2017 06:23 AM2017-01-03T06:23:41+5:302017-01-03T06:23:41+5:30
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ५
पुणे : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जानेवारीला पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे.
हे संमेलन स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ उपस्थित होते. यावेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे यांच्या हस्ते होणार असून त्यांची प्रकट मुलाखत डॉ. मंदार परांजपे घेणार आहेत. डॉ. देखणे लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि पर्यावरण या विषयावर विचार मांडणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या साहित्याचे सादरीकरण या संमेलनात होणार आहे. दुसऱ्या सत्रात पर्यावरणतज्ज्ञ अनिरुद्ध चावजी यांचे ‘रामायणातील पक्षीजीवन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
अशोक नायगावकर आणि रमजान मुल्ला यांच्या कवितांची मैफिलही या संमेलनात रंगणार आहे. संमेलनाचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. (प्रतिनिधी)