बोधकथा 'कल्पना'तीत पर्यावरणप्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:19+5:302021-04-10T04:10:19+5:30
कल्पना राहत असलेल्या घराशेजारी एक झाड होते. त्या झाडाच्या मुळ्या बाथरूममधील पाणी बाहेर जाण्याच्या पाइपमधून आत आल्या होत्या. त्याच ...
कल्पना राहत असलेल्या घराशेजारी एक झाड होते. त्या झाडाच्या मुळ्या बाथरूममधील पाणी बाहेर जाण्याच्या पाइपमधून आत आल्या होत्या. त्याच झाडाची एक फांदी बाथरूमच्या खिडकीतून आत आली होती. एके दिवशी तिच्या घरी गृहविमा कंपनीचे अधिकारी आले. त्यांनी बाथरूम पाहिली व झाडाची ती आत आलेली फांदी तोडून कायद्यानुसार विम्याचा अर्धा हप्ता दंड म्हणून देण्याचा सल्ला तिला दिला. यावर कल्पना म्हणाली, "मी अर्धा नव्हे, विम्याचा पूर्ण हप्ता दंड म्हणून भरायला तयार आहे; पण भविष्यात तुम्ही कुणाला अशी सवलत देऊ नका. कारण त्यामुळे झाडे तोडण्याची व अर्धा वा पूर्ण हप्ता भरून सुटका करून घेण्याची सवय लोकांना लागेल."
कल्पनाचे हे वृक्षप्रेम पाहून कंपनीचे अधिकारी चकित झाले. एवढेच नाही, तर ते झाड वाचविण्यासाठी तिने चक्क त्या बाथरूमचा वापरच बंद करून टाकला.
आपल्या मृत्युपत्रात कल्पनाने विम्यातील काही रक्कम पर्यावरण कार्यासाठी द्यावी, अशी इच्छा लिहून ठेवली होती. कल्पनाच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर अमेरिकन विमा कंपनीने 'पर्यावरण सुरक्षा व संवर्धनासाठी' खर्च करण्यासाठी तब्बल तीन लाख डॉलर्सची, म्हणजे त्यावेळचे सुमारे एक कोटी तीस लाख रुपये इतकी रक्कम भारत सरकारच्या माध्यमातून तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केली. अंतराळ संशोधनासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असलेल्या या भारतीय अंतराळ वीरांगनेचे हे पर्यावरणावरील प्रेम कल्पनातीत असेच म्हणावे लागेल. निसर्गसंवर्धनासाठी घेतलेल्या या निर्णयातून कल्पना चावलाने केवळ पर्यावरणप्रेमच नाही; तर सामाजिक बांधिलकीचा आदर्शही जपला, हेच अधोरेखित होते.
- प्रसाद भडसावळे