जिल्ह्यावर अवकाळीची अवकृपा
By admin | Published: March 2, 2016 01:06 AM2016-03-02T01:06:35+5:302016-03-02T01:06:35+5:30
सोमवारी सायंकाळी पूर्व हवेली तालुक्यातील गावांमध्ये सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे व झालेल्या गारपिटीमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
पुणे : सोमवारी सायंकाळी पूर्व हवेली तालुक्यातील गावांमध्ये सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे व झालेल्या गारपिटीमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले नगदी पीक जमीनदोस्त झाल्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आधीच शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यातच या नैसर्गिक संकटाने तर बळीराजा आर्थिक खाईत लोटला गेला आहे.
लोणी काळभोर , थेऊरमध्ये शासनाचा कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्राथमिक पाहणी करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केला आहे.
पूर्व हवेलीमध्ये प्रामुख्याने गहू या पिकाचे सुमारे २०० हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून कांदा, केळी व विविध प्रकारचे भाजीपाला पिकांना जोरदार तडाखा बसला आहे. नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ, पिंपरी सांडस या भागातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान थेऊर भागातील शेतकऱ्यांचे झाले आहे. नायगाव येथे गहू व कांदा पिकांचे जास्त नुकसान झाले असून त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी कोणी फिरकलेच नसल्याचे नायगावचे उपसरपंच राजेंद्र चौधरी व पेठ येथील शेतकरी गणेश गायकवाड यांनी सांगितले आहे. मात्र, थेऊरमध्ये मंडलाधिकारी हरिदास चाटे, गावकामगार तलाठी संतोष चोपदार, कृषी सहायक बालाजी पाटील व पथकाने नुकसानीची पाहणी करून प्राथमिक अहवाल तयार केला आहे.
तासभर वादळी वाऱ्यासह गारपीट या परिसरात झाली. पाऊस कमी, जोरदार वाऱ्यामुळे पिके जमीनदोस्त झाली. येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे येथील ऊस नेण्यास टाळाटाळ होते व बाजारभाव समाधानकारक मिळत नसल्याने येथील शेतकरीवर्ग उसाचे पीक सोडून भाजीपाला, फळबागा व इतर नगदी पिके घेतो. त्यातच बाजारभावाची हमी नसतानाही पिके शेतकरी पिकवतात. कोथिंबीर, पालक, मेथी, शेपू, कोबी, फ्लॉवर इत्यादी भाजीपाल्यासह गहू व केळीचे पीक घेतले जाते. अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झाले.
> शेतातील उभ्या
पिकांचे मोठे नुकसान
रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती, निमगाव म्हाळुंगी, कोंढापुरी, कासारी, पिंपरी दुमाला परिसरात गारपिटीसह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी या गावाच्या प्रतिनिधींनी केली आहे. सोमवारी (दि. २९) सायंकाळच्या सुमारास विजेचा कडकडाट तसेच गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा, गहू, हरभरा, कलिंगड, टोमॅटो या पिकांसह जनावरांच्या चारापिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अगोदरच आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा वाऱ्याने भुईसपाट झाल्याने या गव्हाची सोंगणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहे.
> चासकमानच्या पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जात आहे. गारपिटीसह पडलेल्या पावसाने संपूर्ण पात पडली, तर काढलेला कांदा अचानक आलेल्या अवकाळी पावसाने भिजून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. कलिंगडाचे वेल तुटून पडल्याचे तसेच फळांनाही गारपिटीचा मोठा फटका बसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. आजही असलेले ढगाळ वातावरण पिकांना मारक असून त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पिसर्वे, मावडीला गारांनी झोडपले
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे, मावडी परिसरात काल अचानक झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांना झोडपून काढले.
यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी प्रत्यक्ष येऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली; तसेच अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
गारपिटीची माहिती मिळताच तहसीलदारांनी आज पाहणी केली. या वेळी डाळिंब, कांदा, कांदा बियाणे, काकडी, हरभरा, मका, ज्वारीचा कडबा, टोमॅटो आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सुरेश किसन कोलते, संतोष सुरेश कोलते, तसेच संपत बबन कोलते यांचे डाळिंब, कांदा, पेरू, कांदा बियाणे, पिकाचे नुकसान झाले. तसेच, मच्छिंद्र आबा कोलते यांचे काकडी, व इतर पिकांचे नुकसान झाले.
कांदा पिकाला गारपिटीमुळे पातच राहिलेली नाही. गारांचा मार बसल्यामुळे कांदा मोठ्या प्रमाणात खराब होणार आहे. डाळिंब फळावरती गारांचा मार बसल्यामुळे अनेक फळे तडकली आहेत. तसेच, फळांवर काळे डाग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
> आंबेगावच्या आदिवासी भागात पावसाची हजेरी
डिंभ: आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात सोमवारी आवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपार नंतर ढगांच्या गडगडाटासह पावसास सुरूवात झाली. अवेळी आलेल्या या पावसामुळे उन्हाळीचारा शेतातील कठाणाचे पीक झाकण्यासाठी आदिवासी शेतक-यांची धावपळ सुरू झाल्याचे पहावयास मिळाले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात आज काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बोरघर अडिवरे खो-यातील भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे आदिवासी शेतक-यांकडून सांगण्यात आले. सुरू झालेला पाऊसच जुन्नर तालुक्यातील सुकाळवेढे,आंबेहातवीज वरून आल्याचे शेतक-यांनी सांगीतले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारासच या भागात पावसाने जोर पकडला होता.
तालुक्याच्या इतर भागातही पाऊस झाला. शिनोली,डिंभ,पोखरी,जांभोरी या गावांतही पावसाने हजेरी लावली. या भागात सध्या आदिवासी शेतक-यांनी उन्हाळीचार उघडयावर रचून ठेवला आहे. तर शेतामध्ये वाटाना,मसूर,हरभरा, गहू या सारखी पीके आहेत. ही पीके काढण्याचा हंगाम सध्या या भागात सुरू आहे. झालेल्या पावसामुळे या पीकांबरोबरच उन्हाळीचाराही भीजू लागल्याने पावसापासून वाचविण्यासाठी आदिवासी शेतक-यांची धावपळ सुरू असल्याचे पहावयास मिळाले.
डिंभे धरणाच्या पाण्यामुळे या भागात विटभट्टी व्यवसायही चांगल्या प्रकारे फोफावला आहे. सध्या आहोरात्र जागून विटभट्टी मालक विटांच्या भट्टया लावण्यात मग्न आहेत. मात्र अवेळी आलेल्या या पावसाची धास्ती या भागातील विटभट्टी व्यवसायीकांनीही चांगलीच घेतली असून अवकाळी पावसापासून तयार केलेल्या विटा वाचविण्यासाठी त्यांचीही तारेवरची कसरत सुरू असल्याचे पहावयास मिळाले.