समतेच्या विचारांना हवी विज्ञानाची जोड : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 08:38 PM2019-12-25T20:38:13+5:302019-12-25T20:41:58+5:30
महात्मा फुले यांनी त्यावेळीच हे ओळखले होते व जाहीरपणे त्याचा उच्चारही केला होता...
पुणे: महात्मा फुले, राजर्षी शाहू यांचा समतेचा विचार आपण स्विकारला, मात्र त्यांनी स्विकारलेली विज्ञानदृष्टी दुर्लक्षित केली. आता ही चूक सुधारण्याची सुरूवात रयत शिक्षण संस्थेपासून झाली आहे. समतेच्या विचारांना विज्ञानाच्या दृष्टीची जोड द्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.
रयत च्या एस.एम.जोशी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. त्यातील लक्ष्मीबाई पाटील सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन व इनक्युबेटर या अत्याधुनिक केंद्राचा समावेश होता. त्याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, एस. एम. जोशी व रामभाऊ तुपे यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण, शताब्दी टॉवर, आंतरराष्ट्रीय मुलींचे वसतीगृह व खेळाच्या मैदानाचेही उद्घाटन करण्यात आले.
पवार म्हणाले, समतेला विज्ञानाची जोड द्यायला हवी होती. महात्मा फुले यांनी त्यावेळीच हे ओळखले होते व जाहीरपणे त्याचा उच्चारही केला होता. त्यांनी इंग्रज राजपुत्राला शेतीत सुधारणा करण्याची, संकरित बी-बियाणे वापरण्याची सुचना केली होती. शेतीला जोडधंदा हवा हेही त्यांनी सांगितले होते. ही विज्ञानदृष्टीच होती. मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष केले. आता रयत च्या माध्यमातून यात सुधारणा होते आहे. अन्य संस्थांमध्येही याचपद्धतीने विज्ञानाचे शिक्षण द्यायला हवे. रयतने अशी अनेक केंद्र सुरू केली आहेत. त्यातून नव्या पिढीतील मुले विज्ञानाला गवसणी घालण्याची शक्ती मिळवतील व समाजाला उपयोगी पडणारे संशोधन करतील.
काकोडकर म्हणाले, आयटीआय मध्ये शिकणारे वेगळे व महाविद्यालयात शिकणारे वेगळे अशी वर्गवारी आपल्याकडे केली जात होती. डोक्याने काम करणाऱ्यांना कौशल्याची आवश्यकता असते. संशोधन करणारे उपलब्ध उपकरणांचा वापर करून ते करतात, मात्र आपल्याला लागणारी उपकरणे आपणच तयार करायचे कौशल्य त्यांच्याकडे नसते. ते निर्माण व्हायला हवे.रयत मध्ये सतत नवे काहीतरी सुरू असते ही फार चांगली गोष्ट आहे, कॉल सेंटर सुरू करण्याचे व तेही अत्याधुनिक पद्धतीचे कामही रयतनेच केले.
रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्तविक केले. पुणे विद्यापीठाचे कुलगूरू नितीन करमळमकर यांचेही यावेळी भाषण झाले. हडपसरमधून आमदार झालेले व रयत च्या कार्यकारिणीचे सदस्य असलेले चेतन तुपे यांचा यावेळी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. अरविंद बुरंगले व अन्य प्राध्यापकांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.