समकक्ष अभ्यासक्रम ठरेल क्रांतिकारी

By admin | Published: September 12, 2016 02:03 AM2016-09-12T02:03:59+5:302016-09-12T02:03:59+5:30

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियातर्फे समकक्ष पदवीसाठी असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

The equivalent course will be revolutionary | समकक्ष अभ्यासक्रम ठरेल क्रांतिकारी

समकक्ष अभ्यासक्रम ठरेल क्रांतिकारी

Next

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियातर्फे समकक्ष पदवीसाठी असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. त्यांची समिती एफटीआयआयमध्ये येऊन माहिती घेणार आहे. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्यास विद्यार्थ्यांना कारकिर्दीच्या संधी अधिक व्यापकरीत्या उपलब्ध होतील. समकक्ष अभ्यासक्रम सुरू झाल्यास, ही क्रांतिकारी बाब ठरेल, अशी माहिती एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी दिली.
कलेचा वारसा समृद्ध करणारी ही जागतिक पातळीवरील संस्था आहे. संस्थेच्या यंदाच्या वर्षी नव्याने निर्मित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाला क्रेडिट सिस्टीम आणि सेमिस्टर पद्धत लागू करण्यात आली आहे. विद्यार्थी पहिल्या सेमिस्टरला अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढील सेमिस्टरला बसण्याची परवानगी दिली जाणार आहे. मात्र, त्या सेमिस्टरलाही यश न मिळाल्यास विद्यार्थी संस्थेमध्ये अडकून राहण्यापेक्षा त्यांना इतर मार्गांचा विचार करता यावा, यादृष्टीने प्रमाणपत्र दिले जावे, यासंदर्भात नियामक मंडळाशी चर्चा सुरू आहे.
एफटीआयआय आणि एनएफएआय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाचे आयोजन पुण्याबाहेरील शहरांमध्येही आयोजन केले जाणार आहे. प्रत्येक शहरात ३-४ दिवसांचा अभ्यासक्रम राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. एफटीआयआयतर्फे स्टेट आॅफ आर्ट या आॅडिटोरियमचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असून जून २०१८ पर्यंत तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, एफटीआयआयच्या ३० एकर जागेत दोन अ‍ॅक्टिंग स्टुडिओ, दोन इनडोअर स्टुडिओ आणि १२ आऊटडोअर सेट उभे राहणार आहेत. एफटीआयआय प्रशासनाने शैक्षणिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. संस्थेच्या परिसरात सीआरटी म्हणजे क्लासरूम थिएटर, तसेच सहाशे आसनी सुसज्ज असे थिएटर व अ‍ॅक्टिंग स्टुडिओ उभारण्याचा संस्थेचा प्रकल्प आहे. त्यापैकी सीआरटीच्या कामास सुरुवात झाली आहे. क्लासरूम थिएटरमध्ये तीन अद्ययावत क्लासरूम, सहा स्टाफरूम व दोन विशेष रूम असतील. क्लासरूम थिएटरच्या प्रकल्पाचे काम महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या मान्यतेअभावी रखडले होते. ३ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प २०१८ मध्ये पूर्ण होईल.
पुढे २२ अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. दिग्दर्शन, अभिनय, संपादन आणि संकलन, ध्वनीसंयोजन यांसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमांबरोबरच संगीत संयोजन, अ‍ॅनिमेशन, रंगभूषा, वेशभूषा या विषयांचे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम शिकवले जातील. चित्रपट, दूरचित्रवाणीशी संबंधित सर्व कलांचा आणि डिजिटल माध्यमांचा समग्र अभ्यास समाविष्ट केला जाणार आहे.


आंदोलनात सरकार संस्थेच्या पाठीशी
नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या गजेंद्र चौहान यांना पदावरून हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी १३९ दिवस संप केला. अशा वेळी केंद्र सरकारतर्फे संस्थेला दिले जाणारे अनुदान थांबवता आले असते. मात्र, सरकारने आडमुठेपणाची भूमिका न घेता संस्थेला पाठिंबा दिला आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ दिले नाही, असे चित्रपट विभागाचे अधिष्ठाता अमित त्यागी म्हणाले.


जाणून घ्या संस्थेचे कामकाज
येत्या १७ व १८ सप्टेंबर रोजी पुणेकर एफटीआयआयमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत दिमाखात ‘एंट्री’ करू शकणार आहेत. चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी आवश्यक तंत्रज्ञ, अभिनेते, दिग्दर्शक घडविण्याचे प्रशिक्षण या संस्थेत दिले जाते. या संस्थेचे कामकाज कसे चालते, याबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. म्हणूनच वर्षातून दोन दिवस संस्था सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार आहे, असे प्रशासनाने ठरविले आहे. संस्थेमधील विविध विभाग, प्रभात स्टुडिओ, संग्रहालय यानिमित्ताने सर्वांना पाहता येतील. शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी दोन दिवस या ठिकाणी भेट देऊ शकतील.

Web Title: The equivalent course will be revolutionary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.