काळाच्या ओघात ‘वाघबारस’ उरला केवळ नैवेद्यापुरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 01:17 AM2016-01-21T01:17:26+5:302016-01-21T01:17:26+5:30
वाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून पौष महिन्यात ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे.
नीलेश काण्णव, भीमाशंकर
वाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणून पौष महिन्यात ग्रामीण भागात वाघबारस साजरी करण्याची प्रथा आहे. पण, काळाच्या ओघात वाघबारस ही प्रथा नेवेद्यापुरती मर्यादित राहण्याची परिस्थिती आहे. सध्या वाघबारसच्या दिवशी जुने -जाणते ग्रामस्थ वाघदेवाच्या मंदिरात खिरीचा नैवेद्य दाखवतात.
रानात जनावरे चरत असताना हिंस्त्र श्वापदांपासून आपल्या गाईगुरांचे संरक्षण व्हावे, यासाठी वाघोबाच्या मंदिरात पौष महिन्याच्या शुद्ध आणि वद्य १२ या दिवशी ‘वाघबारस’ म्हणून साजरी केली जाते. या वर्षी आज
(दि. २१) वाघबारस आहे.
आदिवासी भागात अनेक ठिकाणी वाघदेवाची मंदिरे आहेत. आंबेगाव तालुक्यात पोखरीजवळ वैदवाडी येथे, तर पिंपरगणे गावाजवळ वाघोबाची मंदिरे आहेत. कोकणातही वाघोबाची मंदिरे आहेत. पण वाघबारस साजरी करण्याची प्रथा आता लोप पावत चालली आहे. वाघ संपले, भीती राहिली नाही. भीती गेल्यामुळे वाघबारसही आदिवासी विसरू लागले.
आदिवासींनी वाघाला देव मानले आहे. म्हणूनच काही भागांत वाघोबाची मंदिरे पाहावयास मिळतात. अनेक ग्रामदैवतांच्या मंदिराच्या बाहेर वाघांच्या मूर्ती आहेत. या सणाच्या आधी एक महिना आदिवासींचे सारे देव रानात पारध करण्यासाठी गेलेले असतात. ते वाघबारसेला घरी येतात. त्यामुळे या दिवसाला आदिवासी जीवनात एक वेगळे महत्त्व आहे. वाघबारसच्या निमित्ताने लोक शेतकाम बंद ठेवतात. पूर्वी बहुसंख्य आदिवासी कुटुंबात पन्नासपेक्षा जास्त पाळीव जनावरे असत. त्यांच्या निगराणीसाठी गुराखी असत. नवीन कपडे परिधान करून गुराखी आनंदोत्सव साजरा करत. आता जनावरे फार कमी झाली. या निमित्ताने होणारे पारंपरिक कार्यक्रम मात्र विस्मरणात गेले आहेत.
वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणत. या ठिकाणी गावातील प्रमुख मंडळी, मुले, मुली एकत्र येत. गाईचे शेण, गोमूत्राने वाघोबाच्या मंदिराचा संपूर्ण परिसर शिंपडला जाई. खिरीचा नैवेद्य ठेवून सगळे प्रसाद खात असत. रात्री आठनंतर येथे कोणीही थांबत नसे. गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटविली जाई. सगळे लोक तेथे जमत. गुराखी मुले वाघ, अस्वल, कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळत. उरलेली खीर खेळासाठी वापरली जाई. एखाद्याला वाघ बनवले जाई. या वाघाला पळायला लावून त्याच्या पाठीवर गरम खीर टाकली जाई. ‘आमच्या शिवेत येशील का’असे विचारले जाई. वाघ झालेला गुराखी ‘नाही नाही’म्हणत असे. असे खेळ होत होते. (वार्ताहर)