पूर्वीच्या भांडणावरुन वारज्यात वाहनांची तोडफोड, सहा महिन्यातील पाचवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 01:48 PM2017-12-05T13:48:35+5:302017-12-05T13:48:57+5:30
वारजे येथील रामनगरमध्ये भिमराव शक्ती चौकात पाण्याची टाकीजवळ काही अज्ञात तरुणांकडून ८ वाहनाची तोडफोड करण्यात आली असून वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे - वारजे येथील रामनगरमध्ये भिमराव शक्ती चौकात पाण्याची टाकीजवळ काही अज्ञात तरुणांकडून ८ वाहनाची तोडफोड करण्यात आली असून वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुंडाचा धुडगुस सुरु असून गेल्या महिन्यातील ही पाचवी घटना आहे. पूर्वी झालेल्या लहान मुलांच्या भांडणातून ही घटना मंगळवारी मध्यरात्री साधारण २ वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व नागरिक गाढ झोपेत असताना अचानक तोडफोडीचा मोठा आवाज येऊ लागला तेव्हा काही जणांनी उठून पाहिले असता चार ते पाच जण पळून जाताना त्यांना दिसले़ मात्र त्यांची ओळख पटू शकली नाही़ या घटनेची माहिती पोलिसांना कळताच ते घटनास्थळी हजर झाले.
या तोडफोडीमध्ये एक टेम्पो, दोन रिक्षा, दुचाकी, मोटारी यांचा समावेश आहे. याप्रकरणी संजय शिरोळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा लहान मुलगा आणि दुसऱ्या लहान मुलाबरोबर भांडणे झाली होती. त्या रागातून काही मुलांनी शिरोळे यांच्या घरावर दगडफेक केली़ तेथे पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करुन त्याचा काचा फोडल्या. याप्रकरणी ५ मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वारजे परिसरात गेल्या सहा महिन्यात पूर्वीच्या भांडणावरुन वाहनांची तोडफोड करण्याच्या पाच घटना यापूर्वी घडल्या आहेत.