प्राध्यापक पदाच्या पात्रता सेट परीक्षा उत्तीर्णांच्या कागदपत्रांत त्रुटी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 01:27 PM2019-11-29T13:27:40+5:302019-11-29T13:46:44+5:30
विद्यापीठातर्फे तब्बल ३ हजार ९३३ विद्यार्थ्यांना ई-सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पुणे : प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या सेट विभागाकडे नियोजित कालावधीत वैध कागदपत्र सादर केलेली नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. मात्र, विद्यापीठातर्फे तब्बल ३ हजार ९३३ विद्यार्थ्यांना ई-सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची २३ जून २०१९ रोजी सेट परीक्षा घेतली. त्यात ५ हजार ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु, उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सेट विभागाकडे एका महिन्याच्या आत वैध कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप ३८१ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे कागदपत्र सादर
केली नाहीत.
तसेच विद्यार्थ्यांनी ज्या संवर्गाच्या आधारे परीक्षा दिली. त्याच संवर्गातील जातीचा दाखला, उन्नत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमिलिअर) प्रमाणपत्र जमा करणे बंधनकारक आहे. विद्यापीठातर्फे त्याशिवाय ऑनलाईन ई- सर्टिफिकेट उपलब्ध करून दिले जात नाही.
गेल्या दोन परीक्षांपासून विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ई-सर्टिफिकेट दिले जात आहे. परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पाठविलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाते. त्यानंतर वैध कागदपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर एसएमएस किंवा ईमेलवर मेल पाठवून पात्रतेबाबत कळविले जाते. परंतु, अनेक विद्यार्थी कागदपत्र पाठविल्यानंतर लगेचच ई-सर्टिफिकेट मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कागदपत्रांची तपासणी झाल्याशिवाय त्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ई-सर्टिफिकेट डाऊनलोड करता येत नाही. त्यामुळे अद्याप कागदपत्रे सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लवकर कागदपत्रे पाठवावीत, असे आवाहन विद्यापीठाच्या सेट विभागाने केले आहे.
........
* वैध कागदपत्रे जमा करणे अपेक्षित
जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर आदी चुकीची कागदपत्रे देणाºया विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरताना त्यात उल्लेख केलेली वैध कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा करणे अपेक्षित आहे.
विद्यापीठाने सेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५ हजार ४१५ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ९३३ विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तपासून त्यांचे ई-सर्टिफिकेट उपलब्ध करून दिले आहे. तर विविध विषयातील ७८५ विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात असतानाच सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना दोन वर्षात पदव्युत्तर पदवी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.