ऑक्टोबर हिटपासून सुटका; पुण्यात गारठा वाढू लागला...
By श्रीकिशन काळे | Published: October 29, 2023 07:02 PM2023-10-29T19:02:00+5:302023-10-29T19:02:23+5:30
राज्यात उत्तर महाराष्ट्र व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवामान ढगाळ राहणार
पुणे : शहरातील ऑक्टोबर हिट आता कमी झाली असून, गारठा वाढू लागला आहे. किमान तापमानात घट झाली आहे. दिवसा आणि रात्री देखील गारठा जाणवत असल्याने पुणेकरांनी स्वेटर घालून शेकोट्या पेटवण्यास सुरवात केली आहे. किमान तापमानात आणखी घट होऊन थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. जळगावात आज राज्यातील निचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
राज्यात देखील किमान तापमानाचा पारा घसरलेला आहे. सर्वत्र थंडीची लाट वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे ११.६ एवढे नीचांकी तापमान नोंदवले जात आहे. तर पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर येथे तापमानाचा पारा १५ अंशांच्या खाली येत आहे. त्यामुळे पहाटे गारठा जाणवत आहे. पहाटे काही भागांत धुक्याची दुलई पहायला मिळत आहे.
राज्यात उत्तर महाराष्ट्र व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवामान ढगाळ राहणार आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून येणार असल्याने उत्तर भारतामध्ये थंड वारे दक्षिण दिशेने वाहण्यास सुरुवात होणार आहे. या आठवड्यात राज्यामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही. परंतु, कमाल आणि किमान तापमानात घसरण होऊन गारठा वाढण्यास सुरवात होणार आहे, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील किमान तापमान
पुणे : १४.५
मुंबई २४.५
जळगाव ११.६
कोल्हापूर १९.४
महाबळेश्वर १६.१
नाशिक १४.८
सांगली १८.८
सातारा १६.०
सोलापूर १८.०
छ. संभाजीनगर १३.६