वाहतूक पोलिसांच्या तावडीतून " ते " सुटले पण चर्चेचा विषय ठरले..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 06:47 PM2019-07-25T18:47:26+5:302019-07-25T19:00:55+5:30
गेल्या काही महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर चौकाचौकात कठोर कारवाई केली.
पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर चौकाचौकात कठोर कारवाई केली. या कारवाईच्या बडग्याने पुणेकरांचे धाबे चांगलेच दणाणले. या परिस्थितीत कर्तव्यतत्पर पोलिसांच्या '' दक्ष '' नजरेतुन नियमांचे उल्लंघन करणारे '' चतुर'' पुणेकर सुटणे तसे महाकठीणच. पण जरी चुकून सुटले तरी त्यांच्याकडे बोट न दाखवतील ते पुणेकर कसले..गुरुवारी सकाळी कात्रज- कोंढवा रस्त्यावरील शत्रूंजय चौकात असाच एक प्रकार घडला.एका दुचाकीवर विना हेल्मेट आणि त्यात ट्रिपल सीट जाणारे वाहतूक पॊलिसांच्या नजरेतून सुटले मात्र अभिजीत डुंगरवाल या पुणेकरच्या कॅमेऱ्यात अडकले...
शहरात कधी विना हेल्मेट, लायसन्स नसणे, ट्रिपल सीट प्रवास, सिग्नल मोडणे, अशा या ना त्या विविध कारणांनी रोजच दंड भरण्यापेक्षा नियमांचे पालन केले तर बिघडले कुठे ..? असा समजुतीचा विचार करत जगाला ज्ञान शिकवणाऱ्या पुणेकरांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सुरुवात झाली आहे. पण गुरुवारी सकाळी शत्रूंजय चौकात अशीच एका दुचाकीवर विना हेल्मेट आणि ट्रिपल सीट जाणाऱ्यांवर वाहतूक पॊलिसांनी काहीच कारवाई केली नाही.त्या दुचाकीवर आश्चर्य म्हणजे दोन श्वान आणि एक तरुण प्रवास करत होते. पण हा प्रवास करताना ते तिघेही आपआपला तोल व्यवस्थितपणे सांभाळून होते. खरंतर दुचाकीवरून प्रवास करताना माणसेसुद्धा तोल जाऊन पडतात. पण या तरुणासोबत त्या श्वानांनी सांभाळलेला तोल नक्कीच कौतुकास्पद होता. सोशल मीडियावर या ट्रिपल सीट जाणाऱ्या दोस्तांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला..वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून वाचलेला तो दुचाकीस्वार '' भाऊ '' दिवसभर चर्चेचा विषय ठरला..