ईएसआयसीच्या परीक्षार्थींना राज्याबाहेरची परीक्षा केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 02:16 AM2019-02-18T02:16:39+5:302019-02-18T02:17:03+5:30
राज्य शासन घेते परीक्षा : उमेदवारांना दिल्ली, नोएडा, लखनौअशी ठिकाणे
हडपसर : कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) विभागाच्या वतीने विविध पदांसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी परीक्षा होत आहे. मात्र अनेक उमेदवारांना परीक्षेसाठी महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंदे्र देण्यात आली आहेत. प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच याबाबत ईएसआयसीकडून कुठलेही सहकार्य केले जात नाही, असे राज्याबाहेरील केंद्र मिळालेल्या परीक्षार्थींनी सांगितले.
ईएसआयसीच्या डेंटल हायजिनिस्ट, ईसीजी टेक्निशियन, लॅब असिस्टंट, ओटी असिस्टंट, आॅक्युपेशनल थेरपिस्ट, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि स्टाफ नर्स या पदांसाठी परीक्षा होत आहे. एकूण १५९ पदांसाठी २६ फेब्रुवारी रोजी परीक्षा होत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून आॅनलाइन
अर्ज मागविण्यात आले होते. परीक्षेसाठी उमेदवारांना तीन केंद्रे निवडीचे पर्याय दिले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांनी मुंबई, पुणे आणि नाशिक ही शहरे निवडली होती. परंतु, प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मिळाल्यानंतर उमेदवारांना थेट राज्याबाहेरील परीक्षा केंद्र मिळाल्याचे निदर्शनास आले.
उमेदवारांना चक्क दिल्ली, नोएडा, लखनौै अशा केंद्रांची नावे प्रवेशपत्रावर देण्यात आली आहेत. या गलथान कारभाराचा कळस म्हणजे
प्रवेशपत्रावर दिलेल्या पत्त्याची आॅनलाइन तपासणी केली असता, मॅपवर ही परीक्षा केंद्रे कुठेच दिसत नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे परीक्षेला जायचे असेल, तर केंद्र कुठे शोधणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
खुल्या गटातील उमेदवारांकडून प्रतिअर्ज ५०० रुपये घेण्यात आले आहेत. तर मागासवर्गीय गटातील उमेदवारांकडून २५० रुपये शुल्क घेण्यात आले आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांनी परीक्षेसाठी दिलेले शुल्क वाया जाणार आहे. प्रशासनाने ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही, त्यांचे शुल्क परत द्यावे. तसेच ज्या परीक्षार्थींना राज्याबाहेरील केंद्र दिले आहे, त्यांना तातडीने मदत करून महाराष्ट्रातील केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. परीक्षार्थी आजपर्यंत अशा ठिकाणी गेलेलो नाहीत. तसेच या ठिकाणची काहीही माहिती नाही, त्यामुळे परीक्षेला कसे जायचे, अशी चिंता या उमेदवारांना वाटू लागली आहे. तसेच दूरच्या ठिकाणी जाण्याचा खर्च परवडणारा नाही. रेल्वेने जायचे झाले, तर ४० तासांचा प्रवास आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेचे आरक्षण चार महिने अगोदरच हाऊसफुल्ल झालेले असते. परीक्षार्थींसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष सवलत नाही, त्यामुळे
अनेक उमेदवारांना परीक्षा देता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान,
याबाबत ईएसआयसीच्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधला असता कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही.
परराज्यांत कशी होणार सोय?
उमेदवारांनी परराज्यांत परीक्षेला जाताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रेल्वे अथवा खासगी बसची सुविधा असली तरी २५ ते 30 तासांचा प्रवास करून जावे लागणार आहे. तसेच जेवणाची, राहण्याची सोय कुठे करायची, तो खर्च कसा करायचा अशा चिंतेत उमेदवार अडकले आहेत.
ईएसआयसीच्या परीक्षा राज्य सरकार घेत आहे. त्यामुळे उमेदवारांना योग्य केंद्रे देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. ज्यांना राज्याबाहेरील केंद्र दिले आहे, तसेच, ज्या राज्यातील उमेदवार आहेत, त्यांना त्यांच्या जवळच्या केंद्रावर परीक्षेसाठी सोय करून दिली पाहिजे, ही राज्य सरकारची नैतिक जबाबदारी आहे. .
-अॅड. व्ही. व्ही. बोरकर