सौंदर्याची व्याख्या नेमकी समजावी

By admin | Published: August 11, 2016 03:11 AM2016-08-11T03:11:28+5:302016-08-11T03:11:28+5:30

सौंदर्य ही जिवंत माणसाची नैसर्गिक भूक आहे. मात्र, सौंदर्याबाबत उथळपणाने विचार करणे चुकीचे आहे. बाजारात उपलब्ध असलेली महागडी सौंदर्यप्रसाधने वापरून सुंदर होता येते

The essence of beauty should definitely be understood | सौंदर्याची व्याख्या नेमकी समजावी

सौंदर्याची व्याख्या नेमकी समजावी

Next

पुणे : सौंदर्य ही जिवंत माणसाची नैसर्गिक भूक आहे. मात्र, सौंदर्याबाबत उथळपणाने विचार करणे चुकीचे आहे. बाजारात उपलब्ध असलेली महागडी सौंदर्यप्रसाधने वापरून सुंदर होता येते, हा निव्वळ भ्रम आहे. बाजारातील भूलथापांना बळी न पडता घरगुती उपायांनीही सौंदर्य गवसते. सौंदर्यशास्त्राच्या व्यवसायात दिखाऊपणा व चुकीचा प्रचार केला जातो. खोट्या दाव्यांवर ही बाजारपेठ उभी राहिली आहे. सौंदर्याची व्याख्या नेमकेपणाने करता आली पाहिजे, असे मत डॉ. नितीन ढेपे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. शकुंतला क्षीरसागर पुरस्कृत विलास शंकर रानडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी ‘लोकमत’मध्ये लिखाण करणारे डॉ. नितीन ढेपे यांच्या ‘डॉक्टर, मला सुंदर दिसायचंय’ (मेनका प्रकाशन) या ग्रंथाची या वर्षी निवड करण्यात आली. डॉ. व्ही. एन. करंदीकर आणि डॉ. मनोज देशपांडे यांच्या निवड समितीने या वर्षीच्या पुरस्कारासाठी ग्रंथनिवड करण्याचे काम केले आहे.
प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांच्या हस्ते बुधवारी साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या पुरस्काराचे वितरण झाले. अध्यक्षस्थानी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, डॉ. मनोज देशपांडे व्यासपीठावर होते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, की जागतिकीकरणानंतर वाचकांची अभिरूची बदलली. जीवन सर्व अंगांनी जाणून घेतले पाहिजे, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. मराठी साहित्य ही पूर्वी फक्त प्राध्यापकांची मक्तेदारी होती. आता डॉक्टरही लिहिते झाले आहेत, ही कौतुकाची बाब आहे. सध्या रुग्णसेवेला व्यवसायाचे स्वरूप आले आहे. समाजाची विचारसरणी मानवकेंद्री न राहता व्यापारकेंद्री झाली आहे. या परिस्थितीचा डॉक्टरांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The essence of beauty should definitely be understood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.