तणनाशकाच्या बेकायदा विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्रीय स्तरावर समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:17 PM2017-11-06T15:17:55+5:302017-11-06T15:19:46+5:30
गेल्या काही महिन्यांमध्ये ‘ग्लायफोसेट’ नावाच्या तणनाशकाची महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा या राज्यांमध्ये बेकायदा विक्री सुरु करण्यात आलेली आहे. याचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाने समिती तयार केली आहे.
पुणे : शेतामध्ये वाढणार्या तणांना नष्ट करण्यासाठी शेतकर्यांकडून तणनाशकाची फवारणी केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये ‘ग्लायफोसेट’ नावाच्या तणनाशकाची महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा या राज्यांमध्ये बेकायदा विक्री सुरु करण्यात आलेली आहे. हर्बीसाईट टॉलरन्स (एचटी जीन) हा प्रकार देशात कसा आला, याचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाने समिती तयार केली आहे.
तणनाशक असलेल्या या औषधाच्या फवारणीमुळे कोणत्याही प्रकारचे विपरीत परिणाम होत नसले तरी औषध कंपन्यांनी अद्याप या जीनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेली परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. वास्तविक शासनाच्या जिनॉटीकल इंजीनिअरींग असेसमेंट कमिटीमार्फत ही प्रक्रिया पूर्ण करुन घेणे आवश्यक होते. हे जीन अनधिकृतपणे बाजारात आले कसे याचा शोध घेण्यासाठी केंद्रिय पातळीवर गठीत करण्यात आलेल्या समितीची नुकतीच दिल्लीमध्ये बैठक झाली. या बैठकीला प्रमुख राज्यांमधील कृषी सचिव, कृषी आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि संचालक एम. एस. घोलप उपस्थित होते.
किंमत कमी असल्याने शेतकरी हे तणनाशक विकत घेत आहेत. हे तण सध्यातरी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विकले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, बेकायदेशीरपणे हे जीन बाजारात आणण्यामागे नेमके कोण आहे याचाही शोध घेतला जाणार आहे. या जीनमधील विविध प्रकार तपासण्यासाठी पथकांची नियुक्तीही केली जाणार आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी समितीची दुसरी बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे. ही समिती या जीनचे पर्यावरणीय धोकेही तपासणार आहे. या जीनला परदेशामध्ये मान्यता असली तरी भारतामध्ये अद्याप त्याला परवानगी देण्यात आलेली नाही.