शाळेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना
By admin | Published: November 17, 2014 05:07 AM2014-11-17T05:07:10+5:302014-11-17T05:07:10+5:30
ही समिती येत्या सोमवारी (दि.१७) शाळेला भेट देऊन चौकशी अहवाल तयार करणार आहे.
पुणे : वारजे माळवाडी येथील सह्याद्री नॅशनल स्कूलमधील सहा वर्षांच्या मुलीवर स्कूल व्हॅनचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापना करण्यात आली आहे. ही समिती येत्या सोमवारी (दि.१७) शाळेला भेट देऊन चौकशी अहवाल तयार करणार आहे.
पुणे शहरातील काही नामांकित शाळांमध्ये लहान मुलींवर स्कूलबस चालकांकडून लैंगिक अत्याचार केला जात असल्याची माहिती चालू शैक्षणिक वर्षात एकामागोमाग एक अशा पद्धतीने समोर आली. परिणामी या घटनेची गंभीर दखल घेऊन शिक्षण विभाग, वाहतूक पोलीस यांनी एकत्रितपणे याबाबत जागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानंतर शाळांना विविध सूचना दिल्या. परंतु, सह्याद्री नॅशनल स्कूलमधील विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यामुळे विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांच्या तपासणीचा तसेच शाळा आणि स्कूलबस/स्कूलव्हॅन यांच्यात झालेल्या कराराचा आणि शाळांकडून याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये अद्याप वाहतूक समिती स्थापन करण्यात आली नाही, ज्या शाळांनी स्कूलबसमध्ये महिला वाहक कर्मचाऱ्यांची (लेडी अटेंडन्ट ) नियुक्ती केली नाही, अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाणार का? असा प्रश्न आहे. चार सदस्यांची समिती सोमवारी शाळेला भेट देतील. त्यानंतर शाळेवर कारवाई करण्यात येईल.