बोर्डाच्या परीक्षांबाबत उपाययोजनांसाठी समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:13+5:302021-03-07T04:11:13+5:30
राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या एप्रिल-मे महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढत चालला आहे. ...
राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या एप्रिल-मे महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढत चालला आहे. त्यामुळे परीक्षांचे आयोजन करताना कोणती काळजी घ्यावी; याबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये राज्य मंडळाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ विनय दक्षिणदास, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय जाधव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य विकास गरड, माजी राज्य मंडळ सदस्य नितीन म्हेत्रे, मुळशी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी माणिक बांगर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे एल. एम. पवार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
----------------------------------------------
कोरोना काळात परीक्षा घेताना कोणती काळजी घ्यावी; हे जाणून घेण्यासाठी शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून सल्ला घेतला जाणार आहे. समिती सुचवलेल्या उपाययोजनांमधील आवश्यक उपाययोजना स्वीकारून दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजन केले जाईल.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ