विद्यापीठात मेलबर्न युनिव्हर्सिटीच्या अॅकॅडमीची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:42 PM2019-08-20T18:42:28+5:302019-08-20T19:30:30+5:30
सध्या मेलबर्न विद्यापीठात अभ्यासक्रम राबवताना विद्यार्थ्यांना कला आणि मानव्यता शाखांतील २५ टक्के श्रेयांक घेणे बंधनकारक असते...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठामध्ये मेलबर्न विद्याापीठाकडून ‘अॅकॅडमी फॉर ब्लेंडेड लर्निंग अँड टिचिंग’ची स्थापना करण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात ही अॅकॅडमी स्थापन होणार असून त्याद्वारे सुरुवातीला विज्ञान शाखेचे काम सुरू होणार आहे. पुढील काळात या अकादमीचा विस्तार मानव्यता आणि समाजशास्त्र व कला शाखेसाठी करण्याचा विचार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व मेलबर्न विद्याापीठाचे कुलगुरू डंकन मस्केल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयसरचे डॉ. व्ही. एस. राव, मेलबर्न विद्याापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. अशोक कुमार आदी उपस्थित होते. मेलबर्न विद्याापीठाच्या सहाय्याने २०१६ मध्ये विद्यापीठाशी संलग्न असलेल्या मॉडर्न महाविद्याालयात ब्लेंडेड बीएस्सी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता.या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे.त्यामुळे या पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यासाठी मस्केल पुण्यात आले होते.आता मेलबर्न विद्याापीठाच्या सहकार्याने चालू शैक्षणिक वर्षापासून विद्याापीठात ब्लेंडेड बीएस्सीचे चार अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमास प्रवेशही घेतले आहेत.
मस्केल म्हणाले, मेलबर्न विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या सहकार्याने ब्लेंडेड बीएस्सीचा अभ्यासक्रम तयार केला जाईल.तसेच विविध चर्चासत्र आयोजित केली जातील. सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठात अकादमी स्थापन करण्यात येईल.तसेच पुढील काळात कला आणि समाजशास्त्र शाखांमध्ये ब्लेंडेड अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चर्चा केली जाईल. सध्या मेलबर्न विद्यापीठात अभ्यासक्रम राबवताना विद्यार्थ्यांना कला आणि मानव्यता शाखांतील २५ टक्के श्रेयांक घेणे बंधनकारक असते.त्याच धर्तीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठात अभ्यासक्रम राबवण्याचा विचार आहे.
डॉ.करमळकर म्हणाले,मेलबर्न विद्यापीठाकडून अॅकॅडमी स्थापन करण्यात आल्याने विद्यापीठाचे विद्यार्थी मेलबर्नला पाठविता येतील व मेलबर्नच्या विद्यार्थ्यांनाही पुणे विद्यापीठात येण्याची संधी कशी मिळेल. त्या दृष्टीने प्रयत्न करता येतील.तसेच प्राध्यापकांची देवाणघेवाण शक्य होईल आणि विद्यार्थ्यांना काही शिष्यवृत्तीही उपलब्ध करून देता येईल.