बलात्कारग्रस्तांना विश्वासाने जगता यावे यासाठी ‘रेप क्रायसिस सेंटर’ची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:06+5:302021-09-02T04:20:06+5:30
पुणे : प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे. बलात्कारातून सावरणाऱ्या स्त्रियांना कायदेविषयक मदत देण्यातून अशा माणुसकीविरोधी गुन्ह्यांना केवळ ...
पुणे : प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे. बलात्कारातून सावरणाऱ्या स्त्रियांना कायदेविषयक मदत देण्यातून अशा माणुसकीविरोधी गुन्ह्यांना केवळ प्रतिबंधच होणार नाही, तर अत्याचारग्रस्त स्त्रियांना सशक्तपणे व विश्वासाने जगण्यासाठी सहकार्य करण्याच्या उद्देशाने सहयोग ट्रस्टतर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. बलात्कारासह जगणाऱ्यांना त्यांचे दु:ख व समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून ‘सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे.
सहयोग ट्रस्टच्या सचिव अॅड. रमा सरोदे यांनी मंगळवारीही माहिती दिली. सुरेखा दास, रेश्मा गोखले, गौरांगी ताजणे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. अक्षय देसाई, शार्दूल सहारे, तृणाल टोणपे या वेळी उपस्थित होते.
अॅड. रमा सरोदे म्हणाल्या, ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झालेले असतात, त्यांनी जणू काही स्वत:च चूक केली आहे असा दबाव घेऊन त्या जगत असतात. त्यामुळे त्यांच्या मनातील ताणतणाव एकमेकांसोबत संवाद साधण्यातून कमी करण्याचा प्रयत्न हा सपोर्ट ग्रुप करणार आहे. मायग्रोथ झोन ही कंपनी न्यूरोलिंगविस्टिक तंत्रावर काम करते. त्यांच्यातर्फे प्रशिक्षित व्यक्तीद्वारे बलात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी मोफत मदत करण्यात येणार आहे. मायग्रोथ झोनसोबत सहयोग ट्रस्ट सहकाऱ्याच्या भावनेतून बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना, आपल्या हातून पाप घडले व आपलीच चूक आहे, अशी स्वत:लाच दोष देणारी भावना, मनातील भीती, राग या संदर्भात वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी काम करणार आहे.
अॅड. सुरेखा दास म्हणाल्या, एकीकडे बलात्काराचे प्रमाण कमी होत असताना दुसरीकडे शिक्षा होण्याचे प्रमाणही नगण्य असल्याने बलात्काराशी लढणाऱ्या स्त्रियांना नैराश्य येते.
दरम्यान, बलात्कारग्रस्त स्त्रिया, त्यांची मुले व परिवार यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्याचे काम तुणाल टोणपे करणार आहेत.
---------------------------------------------
चौकट
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार
* २०१९ साली देशात बलात्काराच्या ३२,५५९ घटना
* दररोज ८८ बलात्कार होतात
* राज्यात २०१९ साली बलात्काराचे २,२९९ गुन्हे
------------------------