Pune: इस्टेट एजंटला चोरीप्रकरणी अटक, घरात घुसून महिलेचे लांबवले होते दागिने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:14 PM2024-02-29T12:14:38+5:302024-02-29T12:17:38+5:30
फिर्यादी यांचे घर विकायचे असल्याने इस्टेट एजंट असलेले मलठणकर यांनी चव्हाण यांना फोन करून एक ग्राहक घर घेण्यासाठी इच्छूक असून त्यांना घर पाहण्यासाठी यायचे असल्याचे सांगितले होते....
धनकवडी (पुणे) : इस्टेट एजंट असल्याची बतावणी करत घर पाहण्यासाठी आलेल्या आरोपीने घरातील मंगळसूत्र आणि फोन चोरून नेल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्हीची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सहकारनगर पोलिसांनी आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळाले असून अनिल ज्ञानेश्वर मलठणकर (वय ५८, रा. आंबेडकर शाळेसमोर, लक्ष्मीनगर, पर्वती) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुमित चव्हाण (रा. सहकारनगर) यांनी फिर्याद दिली होती.
फिर्यादी यांचे घर विकायचे असल्याने इस्टेट एजंट असलेले मलठणकर यांनी चव्हाण यांना फोन करून एक ग्राहक घर घेण्यासाठी इच्छूक असून त्यांना घर पाहण्यासाठी यायचे असल्याचे सांगितले होते. दरम्यान दुपारी साधारण साडेबाराच्या सुमारास फिर्यादी सकाळी कामासाठी निघून गेले होते. त्यावेळी त्यांची वयोवृद्ध आई घरामध्ये होती. काम संपल्यावर ते दुपारी दीडच्या सुमारास ते घरी परत आले. तेव्हा खोलीमध्ये टेबलावर ठेवलेला फोन आढळून आला नाही. त्यांनी मोबाईलबाबत आईकडे विचारणा केली. त्यावेळी आईने त्यांना सकाळी साडेअकराच्या सुमारास एक व्यक्ती घरी आल्याचे सांगितले. त्याने सुरुवातीला शेजारी बसून घर पाहून येतो असे सांगून घरात चक्कर मारली.
आतील खोलीत देखील गेल्याचे सांगितले. फिर्यादी यांना आईच्या गळ्यांमध्ये सोन्याचे मंगळसूत्र दिसले नाही. त्या बाबत विचारणा केली असता हे मंगळसूत्र उशीखाली ठेवल्याचे सांगितले. त्यांनी उशीखाली पाहिले असता मंगळसूत्र देखील आढळून आले नाही. मलठणकर यानेच हे मंगळसूत्र आणि आयफोन चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तात्काळ आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. पोलीस अंमलदार अमोल पवार आणि विशाल वाघ यांना खबऱ्या मार्फत मलठणकर बाबत खात्रीशीर माहिती मिळाली. तो ऊरुळी कांचन परिसरात असल्याची माहिती मिळताच त्याच्या मोबाईल नाबरचे लोकेशन काढण्यात आले.
पोलीस अंमलदार सागर सुतकर यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा ठावठिकाणा पथकाला दिला. त्यानुसार, आरोपीला ऊरुळी कांचनमधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक मंगळसूत्र आणि आय फोन हस्तगत करण्यात आला आहे. त्याने आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता पोलि सांकडून वर्तविण्यात आली आहे. ही कारवाई सहकारनगर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बापु खुटवड, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, विशाल वाघ, सागर सुतकर, बजरंग पवार, किरण कांबळे, महेश मंडलिक, निलेश शिवतारे, नवनाथ शिंदे, सागर कुंभार यांनी केली.