देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी

By नितीन चौधरी | Published: December 18, 2023 03:45 PM2023-12-18T15:45:43+5:302023-12-18T15:47:15+5:30

महाराष्ट्राने यंदाच्या हंगामात ऊसगाळपात देखील २९६ लाख टनांचे गाळप पूर्ण करून देशात आघाडी घेतली

Estimated production of 291.50 lakh tonnes of sugar in the country this year state lead in sedimentation | देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी

देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी

पुणे : एल निनोचा प्रादुर्भाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये साखरेचे उत्पादन चांगले होत असून १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात २४.८५ लाख टन, उत्तर प्रदेशात २२.६५ लाख टन तर कर्नाटकात १७.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात ७४.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून गेल्या वर्षी या कालावधीत ८१.८० लक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या साखर हंगामाअखेर देशभरात २९१.५० लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे.

देशभरात १५ डिसेंबरपर्यंत १२ राज्यांतील ४९९ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ८५७.०४ लाख टन उसाचे गाळप केले आहे . गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ९२४.३३ लाख टन ऊसगाळप झाले होते. महाराष्ट्राने यंदाच्या हंगामात ऊसगाळपात देखील २९६ लाख टनांचे गाळप पूर्ण करून देशात आघाडी घेतली असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात २४३ लाख टन तर कर्नाटकात २११ लाख टन ऊसगाळप पूर्ण झाले आहे. तर देशातील साखरेचा सरासरी उतारा ८.६७ टक्के असा असून यात उत्तर प्रदेशाने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात साखरेचा सरासरी उतारा ९.३० टक्के मिळाला आहे तर महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ८.४० टक्के आणि कर्नाटकाचा सरासरी साखर उतारा ८.३० टक्के इतका आहे. अर्थात जसजशी थंडी वाढेल तसतसा साखर उतारा वाढण्याची अपेक्षा आहे.

“केंद्र सरकारने ७ डिसेंबरला इथेनॉल निर्मितीवरील बंधन टाकण्याच्या अकस्मात घेतलेल्या निर्णयामुळे देशभरातील साखर उद्योगात काळजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. केंद्र सरकारनेच प्रोत्साहित केल्यानुसार देशभरातील आसवनी प्रकल्पांनी इथेनॉल निर्मिती क्षमता वाढीमध्ये जवळपास ३५ हजार कोटी रुपयांची गुंवणूक केली आहे. त्यावरील व्याजाचे हप्ते या निर्णयामुळे वेळेवर चुकते न झाल्यास सदरहून चांगले प्रकल्प त्यांची काहीही चूक नसताना आर्थिदृष्ट्या आजारी पडण्याचा धोका निर्माण झाला होता. त्याच सोबत इथेनॉल विक्रीतून २१ दिवसांत मिळणाऱ्या रकमांमुळे कारखान्यांची आर्थिक तरलता सुधारून त्याद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत आणि समाधानकारक ऊस दराची अदायगी करण्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगाच्या संस्थांनी संबंधितांकडे तातडीने दाद मागितल्यानंतर केंद्र सरकारने १५ डिसेंबर रोजीच्या आदेशाद्वारे अगोदरच्या निर्णयात काहीसा बदल करून साखर उद्योगाला अंशतः दिलासा दिला आहे,” असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले.

Web Title: Estimated production of 291.50 lakh tonnes of sugar in the country this year state lead in sedimentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.