शाश्वत मुल्यांशी जोडलेले लेखक हवेत : भारत सासणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:02 PM2018-04-19T13:02:05+5:302018-04-19T13:02:05+5:30
लेखकाने प्रयोगशीलता जपतानाच भोवतालच्या परिस्थितीबाबत संवेदनशीलतेने भाष्य केले पाहिजे. बाह्यवर्तुळात फिरणा-या लेखकांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही.
पुणे : सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लेखकाला लघुकथा लिहायची असते. त्यासाठी त्याला जगण्याची, जीवनपटलाच्या परिघाची जाण असावी लागते. जीवनातील अशाश्वत आणि शाश्वत मुल्ये समजून घ्यावी लागतात. केवळ बाह्यवर्तुळात फिरणा-या लेखकांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही. शाश्वत मुल्यांशी जोडलेले, सर्वसामान्यांच्या जगण्याचा शोध घेणारे लेखक वाचकांच्या मनावर कायमस्वरुपी नाव कोरतात, असे मत ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी व्यक्त केली. सिग्नेट पब्लिकेशनतर्फे रवींद्र जोगळेकर लिखित ‘हास्य बाराखडी’ या विनोदी कथासंग्रहाचे आणि ‘झाले मोकळे आकाश’ या कथासंग्रहाचे प्रकाशन सासणे यांच्या हस्ते बुधवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, एकपात्री कलाकार बंडा जोशी उपस्थित होते. सासणे म्हणाले, ‘समाजाचे विचार, चिंतन, आव्हाने बदलली तसा लघुकथेचा चेहरामोहराही बदलत गेला. लघुकथा हा परदेशी प्रकार नसून, त्याची बीजे मराठी भाषेच्या साहित्य प्रवाहातच दडलेली आहेत. कालानुरुप कथाकारासमोर अनेक आव्हाने उभी राहतात. कथेमधून त्याला सद्यस्थितीचा विचार करुन मांडणी करायची असते. लेखकाने प्रयोगशीलता जपतानाच भोवतालच्या परिस्थितीबाबत संवेदनशीलतेने भाष्य केले पाहिजे.’बंडा जोशी म्हणाले, ‘विनोदामध्ये मोठे सामर्थ्य असते. दररोजच्या ताणतणावातून विनोदामुळे आनंदी जगता येते. आनंद देणे आणि घेणे हेच विनोदी वाड.मयाचे उद्दिष्ट असते. विनोदी साहित्य जीवनाचा अत्यंत वेगळया दृष्टीने विचार करते. विनोद ताणतणाव दूर ठेवणारे बुलेटप्रूफ जॅकेट असते. माणूस खळाळून हसतो तेव्हा खूप सुंदर दिसतो. त्यामुळे विनोदी लेखन करणारे समाजाचे सेवकच असतात. सध्या विनोदी लेखन करणारे मोजके लेखक पहायला मिळतात. दररोजच्या जीवनातील ताणतणाव वाढत असताना गुणवत्तापूर्ण विनोदी लेखनही वाढले पाहिजे.’रवींद्र जोगळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.